विशेष कार्यशाळेस महसूल अधिकाऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

46

जालना । अर्धन्यायिक प्रकरणे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, हिंदु वारस कायदा व मुस्लिम पर्सनल लॉ, बक्षीसपत्र व हक्कसोडपत्र आणि फेरफार नोंदी, वसुलीची कार्यपध्दती, कोर्ट डिक्री प्रकरणे, इनाम वतन व वक्फ जमिन व्यवस्थापनाच्या प्रकरणांबाबत जिल्ह्यात कार्यरत सर्व उपजिल्हाधिकारी, तहसिलदार आणि मंडळ अधिकाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा बुधवार दि.16 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस महसूल अधिकाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या कार्यशाळेस जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश‍ पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांची प्रमुख उपस्थिती होती.

बुधवार दि.16 नोव्हेंबर रोजी दिवसभर चाललेल्या कार्यशाळेत सकाळच्या सत्रात सकाळी 10 ते 10.45 वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता प्रकरण-10 व अभिलेख व नोंदवह्या तयार करणे व त्या सुस्थितीत ठेवणे नियम 1971 विषयक मार्गदर्शन केले. सकाळी 11.30 ते 12.15 वाजेपर्यंत विधी अधिकारी ॲङ विजय औताडे यांनी भारतीय नोंदणी कायदा विषयी माहिती दिली. सकाळी 11.30 ते 12.15 वाजेपर्यंत ज्येष्ठ विधीज्ञ संजय देशपांडे यांनी हिंदू वारस कायदा व मुस्लिम पर्सनल लॉ विषयी माहिती दिली तर दुपारी 12.15 ते 1 वाजेपर्यंत सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी अर्धन्यायिक प्रकरण, सुनावणी कार्यपध्दती व आदेश पारित करणेबाबत सविस्तर माहिती दिली. दुपारनंतरच्या सत्रात दुपारी 2 ते 2.45 वाजेपर्यंत सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी मृत्यू प्रमाणपत्र, बक्षीसपत्र, हक्कसोडपत्र संदर्भातील फेरफार नोंदीची करावयाची कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले. दुपारी 2.45 ते 3.30 वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी संदिपान सानप यांनी वसुलीची कार्यपध्दती सविस्तरपणे विशद केली. सायंकाळी 3.30 ते 4.15 वाजेपर्यंत सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी कोर्ट डिक्री प्रकरणांची अंमलबजावणीविषयी करावयाची कार्यवाहीची माहिती दिली तर कार्यशाळेच्या शेवटी नांदेडचे अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी इनाम वतन आणि वक्फ जमिनींचे व्यवस्थापन कार्यवाहीची माहिती देत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांचे निराकरण केले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, मंडळ अधिकारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.