जालना । सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपी अर्जुन संजय राऊत (रा. राऊतनगर, जालना) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एस. गोरे यांनी सहा महिन्यांसाठी गुरुवारी (दि.३) चांगल्या वर्तणुकीची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीकडून बाँडवर लेखी लिहून घेण्यात आले असून १५ हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.
अर्जुन राऊत याने १७ जून २०१५ रोजी सहायक पोलीस अधीक्षकांच्या दालनात आरडाओरडा करत पोलिसांना शिवीगाळ केली होती. शिवाय, फिर्यादी रामदास विक्रम काकडे, पोलीस कर्मचारी हे काम करत असताना त्यांच्या टेबलावरील फाईल फेकून दिल्या. फिर्यादीची गळचेपी धरून आरेरावीची भाषा केली. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक ए. के. विभूते यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी पंच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तपासिक अंमलदार पोलीस निरीक्षक ए. के. विभूते यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन आरोपीला १५ हजार रुपयांचा दंड व ६ महिन्यांसाठी चांगल्या वर्तणुकीची शिक्षा सुनावली आहे. तसे आरोपीकडून बाँडवर देखील लिहून घेण्यात आले आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ए. डी. मते यांनी काम पाहिले.