जालना (प्रतिनीधी) जालना विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.कैलास गोरंटयाल यांनी आज सोमवारी कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकाऱ्यांसह जावून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जालना विधानसभा मतदार संघातून गोरंटयाल यांना दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जालना लोकसभेचे पक्षाचे प्रभारी डॉ.पी.सी.शर्मा, खा. डॉ. कल्याण काळे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मुरलीधर शेजुळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नंदकिशोर जांगडे, काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेश पदाधिकारी बदर चाऊस, अब्दुल रउफ परसुवाले, रिपाईचे पदाधिकारी किशोर मघाडे, सपाचे जिल्हाध्यक्ष शेख नबी शिपोरकर, आपचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे, विधीज्ञ जक्कलवार, सय्यद याकूब आदींची यावेळी उपस्थिती होती. जालन्याचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत हरकर व तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीमती छाया पवार यांच्याकडे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. कैलास गोरंटयाल यांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी उपस्थित पत्रकारांशी बोलतांना उमेदवार आ. कैलास गोरंटयाल यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांवर जोरदार टीका करत निवडणुकीतील आपले इरादे स्पष्ट केले.