ललितकला विभागाच्या वतीने जेईएस मध्ये लोककला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

16

जालना । प्रतिनिधी – दिवाळीमध्ये शालेय विद्यार्थी व युवकांमध्ये लोककलेची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने येथील जेईएस महाविद्यालयाच्या ललितकला विभाग आणि लोकपरिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने 04 ते 14 नोव्हेंबर दरम्यान लोककला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महाविद्यालयाच्या लोककला विभागात या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये गण, गौळण, शाहीरी, गोंधळ, जागरण, वासुदेव, भारुड या लोककला प्रकारांचे आणि ढोलकी, संबळ, दिमडी, शाहीरी डफ, टाळ, तुणतुणे या लोकवाद्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या वर्षी दिवाळीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी लोककला शिबिराचे आयोजन केले असून या शिबिरात ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘पांडू’ चित्रपटाचे गायक आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगले आणि सुप्रसिद्ध गीत आणि संगीतकार प्रा. कल्याण उगले प्रशिक्षण देणार आहेत.
आपल्या अनेक पिढ्यांचा लोककलेचा वारसा बाल वयापासूनच सांभाळत असणारे जालना जिल्हाचे युवा कलाकार कल्याण उगले आणि शाहीर रामानंद उगले यांना वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून या गोंधळ परंपरेचा परंपरेचे शिक्षण वडील शाहीर आप्पासाहेब उगले यांच्याकडून मिळाले. विविध यात्रा,उत्सव, महोत्सवात आज पर्यंत पाच हजारहून अनेक लोककलेचे प्रयोग त्यांनी आजतागायत केले आहे.
‘झी मराठी’ वरील ‘संगीत सम्राट’ या रियालिटी शो मधून त्यांनी महाराष्ट्रभर नावलौकिक मिळविला आहे .त्यानंतर अनेक टीव्ही शो च्या माध्यमातून आपली लोककला प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात तब्बल 11 गाणी शाहीर रामानंद उगले यांनी गायली आहेत. तसेच विजू माने दिग्दर्शित व अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेला ‘पांडू’ या चित्रपटात सुद्धा त्यांनी पार्श्वगायन केले आहे.
गाडी घुंगराची आली, टाच मारुनी घोड्याला, अंबाबाई लाड लाड ये ग आणि शाहीर कल्याण उगले यांनी रचलेले पोवाडे महाराष्ट्र भर गाजत आहे. महाराष्ट्राची लोककला , संस्कृती टिकून राहावी यासाठी उगले बंधू यांनी शाहीर रामानंद र्र्ूेीीींलश चॅनेल तयार करून महाराष्ट्राची लोकगाणी ही पहिली लोकसंगीत वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस आणली महाराष्ट्र आणि देश विदेशातील मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. हीच परंपरा टिकून राहावी यासाठी जालना शहरात या लोककला शिबिर आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रा.कल्याण उगले किंवा मराठी विभाग प्रमुख डॉ . यशवंत सोनुने यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री यांनी केले आहे.