जालना । प्रतिनिधी – परतुर येथे लोकसभागातून उभारण्यात आलेल्या आणि परतुर पंचक्रोशीतील सुमारे 200 गावांसाठी वरदान ठरत असलेल्या लॉयन्स दृष्टी नेत्रालयाला जालना येथील सोनी परिवाराच्यावतीने 51 हजार रुपयांचे आर्थिक योगदान देण्यात आले. अरुण सोनी, मिनाक्षी सोनी, आनंद सोनी, पुनम सोनी आणि रोटरी क्लब जालना सेंट्रलचे अध्यक्ष डॉ. अभय सोनी यांच्याहस्ते 51 हजाराची देणगी लॉयन्स दृष्टि नेत्रालय परतुरचे अध्यक्ष मनोहर खालापुरे, संचालक अतुल लढ्ढा आणि संजीवनी खालापुरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी लायन्स क्लब जालना मर्चंट सिटीचे सदस्य विनोद पवार आणि विनोद कुमावत उपस्थित होते. नेत्रालयाला भेट दिल्यानंतर, सोनी परिवाराने या सेवाभावी कार्याविषयी जागरूकता निर्माण करत आर्थिक योगदान दिले. मागील दीड वर्षांपासून कार्यरत असलेल्या या नेत्रालयात आतापर्यंत हजारो रुग्णांची तपासणी करण्यात आलेली असून, मोतीबिंदूच्या 2 हजार 700 शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत. लॉयन्स क्लब्सच्या माध्यमातून उभारलेले हे सेवामंदिर नियोजनबद्धरीत्या कार्यरत आहे. लोकसहभागातून उभारलेले हे नेत्रालय समाजासाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. या योगदानाबद्दल नेत्रालयाच्यावतीने सोनी परिवाराला स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.