अनैतिक संबंधाच्या संशयावरून औषध विक्रेत्याचा खून

86

जालना । अंबड शहरातील होळकर नगर येथे पत्नीसोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तसेच बदनामी केल्याच्या कारणावरुन राजेंद्र विठ्ठल भोरे या 40 वर्षीय केमिस्ट व्यवसायिकाचा धारदार चाकूने पोटावर, छातीत तसेच खांद्यावर गंभीर घाव करून जीवे ठार मारल्याची घटना दि.24 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग,अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे,स.पो.निरीक्षक सोमनाथ नरके यांनी फौजफाट्यासह घटनास्थळाला भेट दिली.

घटनेविषयी अंबड पोलिसांत दिलेल्या तक्रारीत मयताची पत्नी निता राजेंद्र भोरे वय 30 वर्षे रा.बोरी.ता.अंबड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, होळकर नगर अंबड येथे वास्तव्यास असणाऱ्या आपले पती राजेंद्र विठ्ठल भोरे यांचा केमिस्टचा व्यवसाय आहे. आरोपी पाराजी गहिनाजी दिवटे रा. होळकर नगर अंबड याने त्यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन तसेच बदनामी केल्याच्या कारणावरुन मनात राग धरून सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बाहेर फिरायला निघालेल्या आपला पती राजेंद्र भोरे यांस धारदार चाकूने पोटावर,छातीत तसेच खांद्यावर गंभीर घाव करून जीवे ठार मारले आहे. अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन अंबड येथे गुरनं 737/2022 कलम 302 भांदवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच गुन्ह्यातील संशयित आरोपी पाराजी गहिनाजी दिवटे रा. होळकर नगर यांस अंबड पोलिसांनी तपासकामी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे हे करत आहेत.