निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, नि:ष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करावे – विभागीय आयुक्त दिलीप गावडे

7

जालना । प्रतिनिधी – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीताचे जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याअनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक नियमांचे व सूचनांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी काटेकोर पालन करुन ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, नि:ष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत विभागीय आयुक्त श्री. गावडे बोलत होते. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, विभागीय उपायुक्त जगदीश मिणियार, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशीकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, सर्व जिल्हा निवडणूक निर्णय अधकिारी, सर्व नोडल अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.
श्री. गावडे की, लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक मतदाराचे मतदान महत्त्वपूर्ण व निर्णायक आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्व नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राज्यघटनेने दिलेल्या मतदान करण्याच्या अधिकाराचा वापर करावा. पुढे बोलतांना ते म्हणाले की, मतदार जनजागृती व साक्षरतेसाठी स्वीप मोहिमे अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात यावे. युवा मतदारांना मतदानाच्या राष्ट्रीय उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करावे. जिल्ह्यातील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांचे गृहमतदान अधिक प्रमाणात होण्यासाठी प्रयत्न करावे. आदर्श आचारसंहितेचे उमेदवारांकडून काटेकोरपणे पालन होत असल्याची खात्री करावी. तसेच मतदान केंद्रे, मतदारांची माहिती, मतदानाची ठिकाणे व तेथील व्यवस्था, प्रशिक्षण कार्यक्रम, मनुष्यबळ, आचारसंहिता कक्ष, सीव्हीजील प, खर्च सनियंत्रण समिती पथक, आदर्श आचारसंहितेचे पालन, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात चेकपोस्टद्वारे तपासणी, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तपासणी, राजकीय प्रचाराच्या जाहिराती व चित्रफीतींचे माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणिकरण, पेड न्यूज आदी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने विविध विषयांचा विभागीय आयुक्तांनी यावेळी सविस्तर आढावा घेतला. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी यावेळी सादरीकरणांद्वारे विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती सादर केली.