मनपाने दहा हजार रुपये भरपाई द्यावी, वकिलांच्या शिष्टमंडळाचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

12

जालना । प्रतिनिधी – शहरातील नुतन वसाहत भागातील पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळल्यानंतर त्या टाकीतील पाणी अनेक भागातील नागरिकांना पिण्यासाठी म्हणून नळाद्वारे पुरवठा करण्यात आले होते. या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यासाठी शहर महानगर पालिकेच्यावतीने या भागातील नागरिकांना उपचारासाठी दहा ते पंधरा हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी वकीलांच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
वकिलांच्या शिष्टमंडळात अ‍ॅड. महेश धन्नावत, अ‍ॅड. महेंद्र साळवे, अ‍ॅड. शुभम भारुका आदींचा समावेश होता.
निवेदनात म्हटले आहे की, शहर महानगर पालिकेचे आयुक्त यांच्या दुर्लक्षतेमुळे नुतनवसाहत, जमुनानगर, विद्युत नगर, आनंद नगर, लहुजी नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, जय नगर, ऋषीपार्क, विसावा शाळा, म्हाडा कॉलनी, रेवगांव रोड, योहान चौक, गंगाधर वाडी, सतकर कॉम्प्लेक्स या परिसरातील लोकांना दुषित पाणी प्यावे लागले व त्यांचे आरोग्य धोक्यात आले. लोकांनी तक्रार केल्यानंतर सुध्दा महानगरपालीका यांनी दुर्लक्ष केले व शेवटी जलकुंभात शव आढळुन आले व लाकडं, बाटल्या अन् चपला सुध्दा आढळुन आल्या. सदर घटना हि दिनांक 14-10-2024 रोजी घडली, नंतर महानगरपालिका यांच्या मार्फत सुध्दा सुचना देण्यात आली होती की, नागरीकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी. त्यामुळे आता अनेक नागरीकांच्या आरोग्यावर दुषित पाण्यामुळे परिणाम झालेले आहे व त्यांना उपचारासाठी खर्च सुध्दा येत आहे. त्यामुळे महानगर पालिकेमार्फत प्रत्येकांना रुपये दहा ते पंधरा हजार द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे शहर महानगर पालिका आयुक्त यांनी जवाबदारी घेत पदाचा त्याग करावा असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.