जालना । प्रतिनिधी – येथील माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांना शिवसेना शिंदे गटात जालना विधानसभा प्रमुखपदी नुकतीत नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीस शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्थगिती दिली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार श्रीकांत पांगारकर यांना जालना जिल्ह्यात शिवसेना पक्षामध्ये जर कोणते पद देण्यात आले असेल तर त्या पद नियुक्तीस स्थगिती देण्यात येत आहे.
गौरी लंकेश या प्रख्यात पत्रकार आणि कार्यकर्त्याची 5 सप्टेंबर 2017 रोजी तिच्या बेंगळुरू येथील निवासस्थानाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र एजन्सींच्या मदतीने केलेल्या तपासात ऑगस्ट 2018 मध्ये जालना येथील माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली होती. पांगारकर हे 2001 ते 2006 पर्यंत शिवसेनेशी संबंधीत होते. नंतर पक्षाने 2011 मध्ये टिकीट नाकारले होते. त्यानंतर ते हिंदु जनजागृती समितीत सहभागी झाले होते.
कर्नाटक उच्च न्यायालयाने 4 सप्टेंबर रोजी पांगारकर यांना जामीन मंजूर केला. जामीनावर असलेल्या पांगारकर यांनी शुक्रवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. श्री खोतकर यांनी पांगारकर यांची जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर दोनच दिवसांनी एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने या नियुक्तीस स्थगिती देण्यात आली.