क्लास वन अधिकारी दीपक सवडे यांचा मानव सेवा मंडळाच्या वतीने गौरव

19

जाफराबाद । प्रतिनिधी – तालुक्यातील अकोला देव येथील दीपक बाबुराव सवडे यांनी राज्यसेवा परीक्षेत 29 वी रँक मिळवून क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केल्याबद्दल टेंभुर्णी येथील मानव सेवा मंडळाच्या वतीने शनिवारी त्यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी दीपक सवडे यांचे वडील बाबुराव सवडे, आई नंदाबाई सवडे यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊराव आटपळे यांनी केले. याप्रसंगी त्यांनी सांगितले की अकोला देव गावातून मोठ्या प्रमाणावर युवक सैन्यामध्ये भरती झालेले आहेत. याशिवाय या गावातून आतापर्यंत चार क्लास वन अधिकारी झालेले आहेत. दीपक सवडे यांच्या माध्यमातून पाचवा क्लास वन अधिकारी गावाला मिळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाच हजार लोकसंख्येच्या गावातून जवळपास साडेतीनशे जण विविध शासकीय नोकर्‍यांमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मानव सेवा मंडळाचे संजय राऊत यांनी सांगितले की, दीपकचे यश ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. प्रबळ इच्छा शक्तीवर यश संपादन करणे कठीण नसते हे दीपक सवडे यांनी दाखवून दिले आहे.
सत्कारला उत्तर देताना दीपक सवडे यांनी सांगितले की आपल्या यशामध्ये आई-वडिलांचा मोलाचा वाटा आहे. घरची परिस्थिती बिकट असतानाही आई-वडील, बहीण व भाऊजी यांनी शिकण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन दिल्याने आपण हे यश संपादन करू शकलो असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाला मानव मंडळाचे प्रांत सचिव नसीम शेख, संजय राऊत, दत्तू मुनेमानिक, संजय निकम, प्रदीप जैस्वाल, गजानन डोमळे, बालाजी मगर, गोविंद जाधव, अकोला देवचे माजी सरपंच रघुनाथ कदम, सामाजिक कार्यकर्ते भाऊराव आटपळे, योगेश सवडे, तलाठी ज्ञानेश्वर सोळंके, तलाठी सुनील निर्मल, लक्ष्मण सवडे, बी.डी. सवडे, बालाजी मोढेकर, गजानन सवडे, दिलीप सकुंडे, भगवान शितोळे, सिद्धेश्वर लंगोटे, स्वाती सोळुंके, नंदा सवडे, बाबुराव सवडे, गजानन सवडे, प्रियंका सवडे, पंकज सवडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊराव आटपाळे यांनी केले तर आभार सिद्धेश्वर लंगोटे यांनी मानले.