परतूर । प्रतिनिधी – परतूर शहरात 15 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या नाट्यगृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी तालुक्यातील शिवप्रेमींकडून केली जात आहे. आपली ही मागणी प्रशासनाकडे पोहचवण्यासाठी शिवप्रेमींच्या वतीने 10 हजार सह्याचे निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी विशेष स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. तालुक्याच्या गावागावातून शिवप्रेमी या स्वाक्षरी अभियानात सहभागी होणार आहेत. शुक्रवारी सकाळी तहसील कार्यालय परिसरात या स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
नाट्यगृहाचे काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्रशासनाने नाट्यगृहाला छत्रपती शिवाजी महाराजाचे नाव देण्याची कार्यवाही करावी अशी मागणी स्वाक्षरी अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी शिवप्रेमींनी केली आहे.गजानन चवडे, नामदेव धुमाळ,प्रा. छबुराव भांडवलकर, विष्णू माकोडे,अजय मिठे, रामजी सोळंके,अंकुश शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती.