पारंपारीक खेळाच्या माध्यमातून दर्जेदार खेळाडू निर्माण होतील – आ. कैलास गोरंट्याल

11

जालना- जालना शहरातील श्री गणेश महासंघाने पारंपरिक खेळाच्या स्पर्धा आयोजित करण्याचे प्रशंसनीय कार्य केले आहे, याच पारंपारिक खेळाच्या माध्यमातून जालन्यातून दर्जेदार खेळाडू निर्माण होतील, असे प्रतिपादन आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज ( दि. १३) येथे केले.
श्री गणेश महासंघातर्फे चंद्रशेखर आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, माजी उपनगराध्यक्ष भास्कर दानवे, मनसेचे जिल्हा प्रमुख रवींद्र राऊत, ज्येष्ठ सामाजिक नेते ॲड. ब्रह्मानंद चव्हाण, रामेश्वर भांदरंगे,  अर्जुन गेही, सिध्दीविनायक मुळे, विश्वनाथ क्षीरसागर, संजय आठवले, महेंद्र रत्नपारखी आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना आमदार गोरंट्याल पुढे म्हणाले की, जालना शहरातील अनेक खेळाडूंनी कुस्ती, कबड्डी, क्रिकेट आदी खेळाच्या माध्यमातून जालना शहराचे नाव रोशन केले आहे. आज आधुनिक खेळ प्रकार वाढीस लागले असून पारंपरिक खेळ मागे पडत चालले आहेत, नवीन पिढीला आपल्या पारंपरिक खेळाची ओळख व्हावी, त्यांच्यात पारंपरिक खेळाविषयी  आवड निर्माण होण्याची गरज आहे. श्री गणेश महासंघातर्फे गणेशोत्सवानिमित्ताने पारंपरिक खेळाच्या स्पर्धा आयोजित करून जालना जिल्ह्यातील क्रीडा चळवळ गतिमान करण्यासाठी पुढाकार घेऊन प्रशंसनीय कार्य केले आहे. पारंपरिक खेळाच्या आयोजनामुळे जालन्यातून दर्जेदार खेळाडू निर्माण होतील, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना भास्कर अंबेकर यांनी श्री गणेश महासंघातर्फे आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून जालना जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन दिले असल्याचे सांगितले. भास्कर दानवे यांनी यावेळी बोलतांना श्री गणेश महासंघातर्फे आयोजित विविध उपक्रमाचे कौतुक करून गणेश महासंघातर्फे यापुढेही असेच सामाजिक उपक्रम राबवले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रास्ताविक करतांना श्री गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर यांनी श्री गणेश महासंघातर्फे प्रथमच विविध उपक्रम व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले असल्याचे सांगितले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश महासंघाचे कार्याध्यक्ष ॲड. महेश धन्नावत यांनी केले. यावेळी गणेश महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. विजय विजय सेनानी,  अर्जुन पित्ती,शिवराज जाधव, क्रीडा प्रशिक्षक प्रमोद खरात, रवींद्र ढगे, प्रशांत नवगिरे, राजू थोरात यांच्यासह श्री गणेश महासंघाचे पदाधिकारी, खेळाडू,क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कबड्डी स्पर्धेत तळेगाव पिंपरी, पैठण, बारमती, नंदापूर,लक्ष्मीनगर, संभाजीनगर, हस्तूर, धामणगाव, आळंद, निकळक अकोला, खरपुडी, जाफ्राबाद, शिंदी, गंगाखेड, निफाड,नाशिक, मानवत, जालना, अकोला, नेवासा येथील मुले- मुलींचे असे ३६  संघ सहभागी झाले आहेत. या कबड्डी स्पर्धेतील सर्व सामने रंगतदार झाले. रात्री उशिरापर्यंत ही कबड्डी स्पर्धा चालली.

आज कुस्त्यांची दंगल
श्री गणेश महासंघाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून शनिवार दि.१४ सप्टेंबर रोजी चंद्रशेखर आझाद मैदानावर कुस्त्यांची दंगल दुपारी १ वा. सुरू होणार आहे. यात अनेक प्रसिध्द मल्ल सहभागी होणार आहे. कुस्तिप्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगारकर तथा अन्य पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.