जालना । प्रतिनिधी – व्यायामाचा अभाव, वाढते ताणतणाव, बदललेली जीवनशैली, अनियंत्रित आहार आदी कारणामुळे मधुमेही रुग्णांची संख्या वाढते आहे. एरव्ही साठीत मधुमेह जडायचा. आता मात्र युवकांनाही तो जडतो आहे आणि प्रारंभीचे काही वर्ष याची जाणीव होत नाही. त्यामुळे उपचार होत नाहीत. परिणामी गुंतागुंत निर्माण होते. वेळीच निदान झाल्यास संभाव्य धोके टाळता येऊ शकतात. ही बाब विचारात घेता गावोगावी मधुमेह निदान शिबिरे घेण्याची गरज असून, रोटरी इंटरनेशनल डायबिटीज डायरेक्टर डॉ. राजेश सेठिया यांच्या सहकार्याने ग्रामीण भागात मधुमेह शिबिरे घेण्याला प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा शिवसेनेचे उपनेते अर्जुनराव खोतकर यांनी येथे बोलताना केले.
जालनासह 11 जिल्ह्याचा समावेश असलेल्या रोटरी प्रांतात मधुमेह तज्ञ डॉ. राजेश सेठीया यांच्या माध्यमातून मधुमेह निदानासाठी ’अबकी बार, एक लाख पार’ हे विशेष अभियान राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत 5 सप्टेंबर रोजी शहरातील श्री पंचमुखी महादेव मंदिरसमोर आयोजित मधुमेह निदान व रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री. खोतकर यांच्याहस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. राजेश सेठीया, रोटरी क्लब जालना रेनबोचे अध्यक्ष महेश माळी, सचिव गौरव करवा यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. खोतकर पुढे म्हणाले की, युवा पिढीतही मधुमेहाचे रुग्ण आढळून येणे ही चिंताजनक बाब आहे. काही लक्षणे दिसत नसल्याने मधुमेह असल्याची जाणीवच अनेकांना होत नाही. मधुमेहाच्या उंबरठ्यावर असलेल्यांना वेळीच उपचार मिळाल्यास मधुमेह रुग्ण बनण्यापासून त्याला वाचविता येऊ शकते. मात्र, त्यासाठी निदान होणे गरजेचे असते. मात्र, माझे काय वय झाले का?, मला तर कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, अशी मनाची समजूत काढून अनेक जण स्वतःहून निदान करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. मात्र, रोटरीने मधुमेह निदानासाठी एक लाख मोफत तपासणी करण्याचा घेतलेला निर्णय खरोखरच स्तुत्य आणि त्याबरोबरच काळाची गरज आहे. त्यामुळे आपणही ग्रामीण भागात अशी मधुमेह निदान शिबिरे घेण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी डॉ. सेठीया व त्यांच्या टीमने या शिबिरात 331 जणांची मधुमेह तपासणी केली. रक्तदान शिबिरात 250 जणांनी स्वयंस्फूर्त रक्तदान केले. तपासणी करणार्यांत 15 टक्के जणांना मधुमेह असल्याचे तर तेवढेच प्रीडायबेटिक असल्याचे निदान झाले, अशी माहिती डॉ. सेठीया यांनी दिली. मधुमेहाचा वाढता विळखा विचारात घेता वेळीच निदान व्हावे यादृष्टीने रोटरी परिवार व सौ. जमनाबाई शिवरतन बगडिया चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने शिबिरे आयोजित केली जात असून, त्यात तपासणी करून घ्यावी, डॉ. सेठीया म्हणाले.
या शिबिरासाठी संतोष तिवारी, केतन शहा, कृष्णा खोतकर, जनार्धन खोतकर आणि रुबी हॉस्पिटलच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.