जालना । प्रतिनिधी – जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांची पदे तातडीने भरावीत यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहे. शासनाने सदर पदे भरल्यास याच शैक्षणिक वर्षापासून सदर कॉलेज सुरू होईल असा विश्वास आ. कैलास गोरंटयाल यांनी व्यक्त केला आहे.
जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरी पासून त्यासाठी जागा निश्चिती आणि अन्य सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी आ. कैलास गोरंटयाल यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून विधिमंडळाच्या पावसाळी, हिवाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील या प्रश्नावरून सभागृहात टोकाचा संघर्ष करत जालन्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. राज्य सरकारने त्यांच्या या संघर्षाची दखल घेत जालन्यातील मंजूर करण्यात आलेल्या या महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासह वसतिगृह आणि अन्य बाबींसाठी तब्बल 404 कोटी रुपयांचा निधी देखील मागील काही महिन्यांपूर्वी मंजूर करून त्याची तरतूद केली आहे. मात्र, पद भरतीची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे जालन्यासह राज्यातील 11 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना पदभरती करण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथकाकडून दोन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. दि. 24 जून 2024 रोजी दिल्ली येथील वरिष्ठ अधिकार्यांचे पथक जालना येथे आले होते. या पथकाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चित करण्यात आलेली जागा व अन्य बाबींची तपासणी करून त्यात काही त्रुटी काढल्या होत्या. मात्र सदर त्रुटींची पूर्तता करून त्याबाबतचा अहवाल मेडिकल कौन्सिलकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगून आ.गोरंटयाल म्हणाले की, दि. 7 ऑगस्ट 2024 रोजी व्हीसीद्वारे झालेल्या सुनावणीच्या वेळी जुलै ते ऑगस्ट 2024 या कालावधीत महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्या अधिकारात स्थानिक पातळीवर 11 सहाय्यक प्राध्यापक आणि 14 वरिष्ठ निवासी पदे भरण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, उर्वरित पदांची भरती न झाल्यामुळे प्रथम अपील अमान्य करण्यात आले होते. याप्रकरणी दुसरे अपील केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण या मंत्रालयाकडे दाखल करण्यात आले असून त्यावर उद्या दि. 10 सप्टेंबर मंगळवार रोजी केंद्रीयमंत्री जे.पी. नड्डा यांच्या दालनात सुनावणी होणार असल्याचे आ. गोरंटयाल यांनी सांगितले. नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अपेक्षित असणारी जागा अधिष्ठाता यांच्या नावावर झाली असून जालना येथील सिव्हील हॉस्पिटलला मेडिकल कॉलेज संलग्न करण्यात आले आहे. शिवाय ग्लोबल गुरुकुलची जागा मेडिकल कॉलेजसाठी भाडे तत्वावर घेण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पद भरतीचा प्रश्न उरला असून राज्य शासनाच्या सचिवांनी पद भरती संदर्भातील हमीपत्र देखील केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयास सादर केले असून उद्या मंगळवारी त्यावर सुनावणी होणार असल्याचे आ.कैलास गोरंटयाल यांनी स्पष्ट केले. प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक या पदांची भरती तातडीने करण्यात यावी यासाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करत असून त्यासाठी सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ही पदभरती झाल्यास याच शैक्षणिक वर्षापासून जालन्यातील मेडिकल कॉलेज सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.