जालना । प्रतिनिधी – परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघ, जालना जिल्हा व मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी किंवा ढगफुटी झाली आहे. तर काही ठिकाणी सततचा पाऊस मागील महिनाभरापासुन सुरु आहे. अशा परिस्थितीत ऊन न पडल्याने शेतकर्यांच्या पीकांचे मोठे नुकसान झालेले आहे. या बाबीची गंभीरता लक्षात घेऊन शेतकर्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, परतूर मंठा नेर सेवली विधानसभा मतदारसंघासह जालना जिल्ह्यात व मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी किंवा ढगफुटी झाली आहे. तर काही ठिकाणी सततचा पाऊस मागील महिनाभरापासून सुरू आहे. अशा परिस्थितीत सततच्या पावसामुळे महिनाभरात ऊन पडलेलेच नाही, परिणामी शेतकर्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. साधारणपणे 65 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस पडल्यास त्या मंडळाचा समावेश अतिवृष्टी मध्ये केला जातो, माझ्या विधानसभा क्षेत्रातील मंडळांमध्ये 100 ते 200 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस पडलेला आहे. केंद्र सरकारच्या नियम आणि निकषाप्रमाणे 33% पेक्षा अधिक नुकसान झाले असेल तर पिकविमा कंपनी मदत करते परंतु ज्या शेतकर्यांनी पिक विमा भरलेला नाही अशा शेतकर्यांना राज्य सरकारच्या व्यक्तिमत्व आर्थिक मदत देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने या बाबीची गंभीरता लक्षात घेऊन शेतकर्यांना सरसकट मदत करावी अशी लोकप्रतिनिधी म्हणून मागणी आहे.
काही मंडळांमध्ये 65 मिलिमीटर पेक्षा कमी पाऊस पडलेला असला तरी देखील सततच्या पावसामुळे मागील महिनाभरापासून ऊन पडलेले नाही परिणामी कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीनची वाढ मोठ्या प्रमाणात झाली असली तरी शेंगा लागलेल्याच नाहीत. कापसाला आलेले फुल आणि बोंड दोन्ही गळून पडले आहेत, कापसाच्या मुळ्या काळ्या पडल्या असून सडल्या आहेत त्यामुळे त्या मुळ्या अन्नद्रव्ये घेऊ शकत नाहीत ही परिस्थिती परतुर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात आहे. परिणामी यावर्षी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड मोठ्या अडचणीत सापडला आहे. नियम आणि निकषाप्रमाणे माझ्या परतूर विधानसभा मतदारसंघासह जालना जिल्हा व मराठवाडाभरात शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्यामार्फत योग्य तो अहवाल मागवण्यात यावा, अतिवृष्टी ढगफुटी व सततच्या पावसामुळे शेतकर्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून या सर्व बाबींची दखल घेत या आर्थिक संकटातून शेतकर्यांना बाहेर काढण्यासाठी सर्वच शेतकर्यांना सरसकट मदत करण्यात यावी, अशी मागणी आ. लोणीकर यांनी केली आहे.