जालना । श्रीक्षेत्र जांब समर्थ येथील समर्थ रामदास स्वामींच्या देव्हाऱ्यातील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्ती तपासासाठी पोलीस दलातर्फे सर्व प्रकारे शर्तीचे प्रयत्न केले जात असून माहिती देणाऱ्यास दोन लाखांचे बक्षीस जाहीर केल्यानंतर आता तपासात अधिक गती वाढविण्याकरिता सात विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी हिंदू समाज शिष्टमंडळास दिली. तथापि मूर्ती चोरीच्या तपासाबाबत आगामी आठ दिवसात ठोस निष्पन्न होईल. अशी पुष्टी जोडत पोलीस अधीक्षकांनी तपासासाठी कालावधी मागितला.
जांब समर्थ येथील समर्थ रामदास स्वामींच्या देव्हाऱ्यातील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तींची चोरी होऊन 56 दिवसांचा कालावधी लोटला तरीही तपास लागत नसल्याने. सोमवारी ( ता. 17) हिंदू समाज शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा केली आणि लेखी निवेदन दिले. आपण दररोज मूर्ती चोरीच्या तपासाबाबत माहिती घेत असून दर आठवड्यास पोलीस महानिरीक्षक ,पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री स्वतः आढावा घेत आहेत. असे सांगून सराईत गुन्हेगारांची चौकशी करण्यासह आंतरराज्य मूर्ती चोर टोळ्या सुद्धा पोलीस दलाच्या रडारवर आहेत .याशिवाय अधिक व्यापक दृष्टीने तपास करण्यासाठी आय.टी. सेल, तसेच पोलीस महानिरीक्षकांच्या आदेशानुसार विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.असे पोलीस अधीक्षकांनी शिष्टमंडळास सांगितले.
प. पू. मनोज महाराज गौड यांनी मुर्ती तपासात यश मिळावे यासाठी पुढील दोन दिवसानंतर मंदिरांमध्ये आपापल्या स्तरावर भजन, नामसंकीर्तनासारखे धार्मिक उपक्रम करावेत असे नमूद केले. तर श्रीराम भक्त ॲड. अर्जुन राऊत यांनी दिवाळी पर्यंत मुर्ती तपासाची शांतपणे वाट पाहत पोलीस दलास सहकार्य करणार असून उलगडा न झाल्यास दिवाळीनंतर आंदोलन तीव्र केले जाईल. असा इशारा श्रीराम भक्त ॲड. अर्जुन राऊत यांनी यावेळी दिला. यावेळी हरे कृष्णा सत्संग समितीचे किशोर तिवारी, सी.ए.गोविंदप्रसाद मुंदडा, वेणूगोपाल झंवर, आकाश जगताप, रोहित पाचफुले, कार्तिक चौधरी, कैलास अग्रवाल, सागर देवकर, वैभव जगताप ,सुधीर राऊत ,कृष्णा जगताप, सतीश जाधव, कार्तिक वाघ, उदयराज मिसाळ, उमेश पवार ,सिद्धार्थ चौधरी, प्रदीप काटकर, गणेश चौधरी, तरुण जांगडे यांच्यासह श्रीराम भक्त व हिंदू समाज बांधवांची उपस्थिती होती.