ग्रामीण भागात व्यापारी संघटना मजबूत करणार – आदेशपालसिंग छाबडा

8

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या नूतन संचालक  मंडळाची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगर येथे १ सप्टेंबर  रोजी  रविवारी चेंबरचे अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी तालुका व गाव पातळीपर्यंत व्यापारी संघटना मजबूत करण्यास प्राधान्य देण्याचे सर्व संमतीने ठराव पारित करण्यात आला.
सरकार  दरबारी व्यापाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करायचे असल्यास व्यापारी संघटना ग्रामीण, तालुका स्तरावर मजबूत असणे आवश्यक आहे. त्यासाठी मराठवाडा चेंबरचे संचालक मंडळ प्रयत्न करणार आहे. तसेच व्यवसाय कर रद्द करण्यासंबंधी सरकार दरबारी चेंबरकडून अनेकवेळा निवेदने देण्यात आली आहेत. तरी अद्याप सरकारने हा कर रद्द केलेला नाही. सरकारने हा कर रद्द केला नाही तर पुढील काळात व्यापारी वर्गाचा तीव्र आंदोलन उभारण्याचा िनर्धार बैठकीत करण्यात आला. मराठवाड्यातील काही महानगरपालिका २४ तास जनतेस पाणी पुरवठा करत नाही. तरीही पूर्ण पाणीपट्टी वसूल करत आहे. याबद्दल बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. त्याविषयी महानगरपालिकेच्या आयुक्तांना जाब विचारण्याची तयारी चेंबरने केली आहे. या बैठकीस महासचिव शामसुंदर लोया , कोषाध्यक्ष विकास सावजी, वरिष्ठ उपाध्यक्ष  सुरेंद्र रेदासणी, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत राठी, सूर्यकांत हाके, संजय मोदानी, सचिव संतोष कावळे पाटील, जफर मिर्झा, सहसचिव संजय दाड आदी उपस्थित होते.