जालना । प्रतिनिधी – येथील जेईएस महाविद्यालयात सुरू होणार्या ललित कला अकादमीचे उद्घाटन आणि संगीत मैफिलीचे आयोजन आज (दि.30) शुक्रवार रोजी सुप्रसिद्ध गायक विश्वनाथ दशरथे यांच्या हस्ते होणार आहे.
महाविद्यालयाच्या केंद्रीय सभागृहात सायंकाळी 05.00 वाजता होणार्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया राहणार असून या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्रीनिवास भक्कड, प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री या अकादमीच्या मार्गदर्शक डॉ. मोहिनी रायबागकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या उद्घाटन समारंभा नंतर एक सुंदर बहारदार संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
जालना शहरात संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला या कलांच्या प्रशिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी जेईएस महाविद्यालयात यावर्षीपासून ललित कला अकादमीची सुरुवात होत आहे. यापूर्वी महाविद्यालयात लोककला आणि नृत्य या दोन कलांचे प्रशिक्षण उपलब्ध होते. लोककला प्रशिक्षणासाठी सुप्रसिद्ध शाहीर,गीतकार आणि संगीतकार कल्याण उगले आणि सुप्रसिद्ध शाहीर रामानंद उगले यांचे तर नृत्यासाठी नृत्यगुरू अजय शेंडगे मार्गदर्शन मिळत आहे. यावर्षी गायन आणि तबला वादन यांची भर पडणार आहे. पुढील काही दिवसांनी अभिनयाचे प्रशिक्षण या अकादमीच्या माध्यमातून मिळणार आहे.
सध्या या अकादमीत लोककलेबरोबर संगीत, गायन, वादन आणि नृत्य या कलांचे प्रशिक्षण उपलब्ध आहे. याचा आणि संगीत मैफिलीच आस्वाद शहरातील संगीत रसिकांनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, अकादमीचे समन्वयक डॉ. यशवंत सोनुने, लोककला विभागाचे प्रमुख प्रा. कल्याण उगले आणि जय कराड यांनी केले आहे.