जालना : मागील वर्षभरात माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी पाठपुरावा केल्यामुळे जालना शहर आणि ग्रामीण भागात सुमारे 200 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. शहर आणि ग्रामीण भागात विविध विकास कामांचा धूमधडाका सुरू असतानाच पुन्हा नव्याने 20 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा वरदहस्त असल्याने आणि विकास कामांना प्राधान्य देण्याच्या धोरणामुळे आपल्या जालना विधानसभा मतदारसंघाचे चित्रच पालटणार असल्याचे माजी राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर यांनी म्हटले आहे.
माजी राज्यमंत्री श्री. खोतकर यांनी म्हटले आहे की, महिलांसाठी मुख्यमंत्री माझी ‘लाडकी बहीण’ योजनेसह कोट्यावधी रुपयाच्या विविध योजना प्रत्यक्षात राबविण्यात येत आहेत. बेरोजगार तरुणांसाठी लाडका भाऊ योजना सुरू आहे. शेतकऱ्यांना थेट मदतीसाठी सोयाबीन व कापूस पिकाला दोन हेक्टर पर्यंत (प्रत्येकी पाच पाच हजार) अनुदान दिले जानार आहे. याशिवाय वेगवेगळे अनुदान दिले जात आहे. विहिरीसाठी 3 लाखावरून थेट 5 लाखापर्यंत अनुदान मंजूर केले आहे. समाजातील सर्व घटकांना मदत होईल असेच धोरण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राबविले आहे.
*शहराचा चेहरामोहरा बदलणार*
आज पर्यंत ‘स्वच्छ जालना सुंदर जालना’ अशा बाता अनेकांनी मारल्या. प्रत्यक्षात पालिकेत सत्ता असूनही विकास कामे करण्याऐवजी पालिके विरुद्ध आंदोलन करण्याचे नाटक केले. आज शहरातील प्रत्येक भागात विकासकामे सुरू आहेत. महानगरपालिका झाल्यामुळे मोठा निधी शहराला मिळत आहे. मनपाला विरोध करणाऱ्याचे आता पितळ उघडे पडले असून विकास कामामुळे डोळे दिपत असतील. मागील वर्षभरात शहरातील प्रमुख विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून आपण सुमारे 200 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून मिळविला आहे. त्यातून विकासकामांचा धडाका सुरू आहे.
20 कोटीची कामे मंजूर
जालना शहरातील वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न आपण जाणून घेतले. त्यांच्या मागणीनुसार विविध वार्डातील विविध विकास कामासाठी 20 कोटी रुपयांचा निधी पुन्हा मंजूर केला आहे. त्यातून आता सिमेंट रस्ते, सामाजिक सभागृह, संरक्षण भिंत,बुद्ध विहार, ख्रिश्चन स्मशानभूमी, पेवर ब्लॉक बसवणे, भूमिगत नाली बांधकाम, मुख्य सिमेंट रस्ते, कब्रस्तान संरक्षण भिंत, बसवेश्वर चौक विकसित करणे ,दर्गा येथे सभागृह बांधकाम, विविध मंदिरासमोर सभागृह उभारणे, संत सावता मंदिरासमोर लादिकरण करणे, वडारवाडी येथे सभागृह, हिंदू ,बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम, स्मशानभूमीचा विकास करणे, भावसार समाजासाठी भावसार भवन बांधकामासाठी 60 लक्ष रुपये निधी,अशा पद्धतीने सुमारे 20 कोटीचा निधी प्राप्त झाला असून लवकरच या कामाचा शुभारंभ होणार आहे. विकास कामे करताना सर्व समाजघटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विकास कामांचा रथ असाच पुढे जाणार असून शहराचे चित्र प्रत्यक्षात पालटणार आहे.
माऊली नगरचा रस्त्याचा गंभीर प्रश्न सुटला
अंबड रस्त्यावरील यशवंतनगर, माऊली नगर भागातील मुख्य रस्त्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. नागरिक, विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. या भागातील महिला आणि जेष्ठ नागरिकांनी पाठपुरावा केल्यामुळे आपण सुमारे 68 लक्ष रुपये या रस्त्यासाठी मंजूर केले आहेत. ऍड राजेश वाघ यांचे निवासस्थान ते राजपूतवाडी डीपी रोडपर्यंत पूर्ण रस्ता केला जाणार आहे. याशिवाय माऊली नगरमध्ये इंजि. दावनगावे यांच्या घराशेजारी एक सभागृह मंजूर झाले आहे. वैष्णव यांचे घर ते मोहिते यांच्या घरापर्यंत 20 लाख रुपयेचा सिमेंट रस्ता मंजूर झाला असून याआधी अंतर्गत रस्ते व तीन सभागृह पूर्ण झालेले आहेत. माऊली नगरचे भाग्य उजळले असल्याची भावना या भागातील नागरिक व महिलांनी व्यक्त केली आहे, याचे आपणास समाधान आहे.