जालना/प्रतिनिधी -मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल जाणून बुजून अपशब्द वापरून् धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी त्यांच्यावर तात्काळ कठोर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी जमियत- ए-उलेमा जालनाच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
या संदर्भात जमियत- ए-उलेमाच्या शिष्टमंडळाने सोमवार दि. 19 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराज सरला बेटचे रामगिरी गुरू नारायण गिरी मौजे पंचाळे (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील प्रवचनादरम्यान त्यांनी इस्लाम धर्मियांचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी जाणुन बुजून अपशब्द वापरून इस्लाम धर्म व प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना बदनाम करण्याचे कृत्य केले आहे. त्यांच्या या प्रवचनाचे फेसबुक, यूटयूब इत्यादी सोशल मीडियातून लाईव्ह प्रक्षेपण सुरू होते. त्यांनी हिंदू धर्मियांना इस्लाम धर्माबाबत चुकीची माहिती प्रवचनाद्वारे देवून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. सध्या भारतात व जगात इस्लाम धर्म व प्रेषित मोहम्मद पैगंबर यांना मानणारे करोडो लोक आहेत. ते मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचे आचरणसुध्दा करीत आहेत. प्रेषित यांचा आदर आमच्या मनामध्ये स्वतः पेक्षा जास्त आहे हे संपूर्ण जगाला माहिती आहे. साधु, संत व पादरी यांचे कर्तव्य आहे की, त्यांनी आप आपल्या धर्माच्या चांगल्या शिकवणी लोकांसमोर सादर करून जीवन कसे जगवायचे याबाबत आपल्या शिकवणीतून दाखवावे. परंतू आजच्या काळामध्ये निवडणूका डोळ्यासमोर ठेवून व सत्ता मिळविण्याकरीता जाणून बुजून काही मंडळी एकमेकांच्या धर्मियांच्या पवित्र लोकांबद्दल अपशब्द उच्चारून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत. अशा मंडळीवर कठोर कारवाईसाठी संसदे व विधानसभेत स्वतंत्र कायदा करण्याची गरज आहे. रामगिरी गुरू नारायण गिरी महाराज यांचे वक्तव्य इस्लाम धर्मियांची भावना दुखावणारे असून त्यांच्यावर सध्याच्या भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यासारखे आहे. व अशी घटना घडल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण भारतात उमटत असतांना, विविध ठिकाणी निदर्शने व मोर्चे निघत असतांना मुख्यमंत्री यांनी ज्या प्रकारे नाशिकमध्ये रामगिरी गुरू नारायण गिरी महाराज यांच्या प्रवचनात जावून एक प्रकारे त्यांना अभय देण्याचे कृत्यही निषेधार्थ आहे. त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. रामगिरी गुरू नारायण गिरी महाराज यांच्यावर तात्काळ कठोर कार्यवाही करण्यात यावी व भविष्यात अशा प्रकारचे कृत्य कोणीही करू नये याकरीता स्वतंत्र कायदा अस्तीत्वात आणावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदन देताना मुफ्ती फहीम, मुफ्ती सोहेल, मुफ्ती युसुफ, मुफ्ती फारुख, हाजी अब्दुल हमीद, मोलाना हबीब, माजी नगरसेवक मोहम्मद नजीब, शेख वसिम लालमिया, शेख शकील लालमिया, अब्दुल खालेद सिद्दिक, हाजी इम्रान, शेख रईस,आतिक अन्सारी, शैबाज फौजी, अकबर सिद्दीकी यांची उपस्थिती होती.