जालना – पर्यटन व सांसकृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयान्वये दि.7 सप्टेंबर 2024 पासुन सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय झाला आहे. इच्छुक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी 31 जुलै 2024 च्या शासन निर्णयात परिशिष्ट अ मध्ये अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. तरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबईच्या [email protected] या ई-मेलवर दि.31 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची पुरस्कारासाठी निकषांच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत स्पर्धेत गायन, वादन, नृत्य, नाट्य, लोककला, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कला, हस्तकला, चित्रकला, शिल्पकला आणि माहितीपट अथवा चित्रपट यांना प्रत्येकी 2 गुण याप्रमाणे एकुण 20 गुण देण्यात येणार आहेत. संस्कृतीचे जतन व संवर्धनामध्ये संस्कृती संवर्धनासाठी अभिनव उपक्रम, पारंपरिक नाणी शस्त्र, भांडी इत्यादीचे संग्रहांचे प्रदर्शन, साहित्य विषयक उपक्रम, लुप्त होणाऱ्या कलाविष्कारांचे संवर्धन यांना प्रत्येकी 2 गुण याप्रमाणे एकुण 10 गुण देण्यात येणार आहेत. तसेच राज्यातील गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन 5 गुण तर राष्ट्रीय, राज्य स्मारके, धार्मिक स्थळांविषयी जनजागृकता, जतन व संवर्धन प्रत्येकी 5 गुण देण्यात येतील.
सामाजिक उपक्रमात महिला सक्षमीकरण, पर्यावरण रक्षण, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार व प्रसार, व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मुलन, सामाजिक सलोखा, ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, आरोग्यविषयक उपक्रम, शैक्षणिक उपक्रम, कृषीविषयक उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाची जनजागृती, वंचित घटकांसाठी उपक्रम यांना प्रत्येकी 2 गुण याप्रमाणे 25 गुण देण्यात येतील. तर आरोग्य सेवा, ग्रंथालय, वृध्दाश्रम, एखादे गाव दत्तक घेणे व इतर सामाजिक सेवा आदि कायमस्वरुपी सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांना 5 गुण देण्यात येतील.
गुणांकनामध्ये पर्यावरणपुरक मुर्ती 5 गुण, पर्यावरणपुरक सजावट 5 गुण, ध्वनीप्रदुषणमुक्त वातावरण 5 गुण, पारंपरिक किंवा देशी खेळांच्या स्पर्धा 10 गुण तर पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृह, वैद्यकिय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे आयोजन किंवा आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता अशा गणेश भक्तांसाठी देण्यात येणाऱ्या प्राथमिक सुविधांना प्रत्येकी 2 याप्रमाणे एकुण 10 गुण अस सर्व मिळून 100 गुण देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांचा कार्याबाबतचा कालावधी सन 2023 च्या अनंत चतुदर्शी ते सन 2024 च्या गणेश चतुदर्शीपर्यंतचा असावा.
शासन निर्णयातील बाबींची पुर्तता करण्यास इच्छुक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी दि.31 जुलै 2024 च्या शासन निर्णयात अर्जाचा नमुना परिशिष्ट अ मध्ये उपलब्ध आहे. सार्वजनिक गणेश मंडळाने पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबईच्या [email protected] या ई-मेलवर दि.31 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. जिल्ह्यातील सर्व सहभागी गणेशात्सव मंडळामधून जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या एका उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस राज्य समितीकडे करण्यात येईल. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.