जालना – जिल्ह्यात महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्हा कृषि विज्ञान केंद्र, खरपुडी येथे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांसाठी सोमवारी (दि.5) कृषि मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपली प्रगती करावी, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.
कार्यक्रमास मराठवाडा शेती सहाय्यक मंडळाचे सचिव विजय आण्णा बोराडे, सहयोगी संचालक (संशाधन राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प) डॉ. एस.बी. पवार, माजी सहयोगी अधिष्ठता (पशु वैदयकीय महाविदयालय परभणी) डॉ. नितीन मार्कंडेय, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गहीनीनाथ कापसे, प्रा. पंडीत वासरे व प्रा. अजय मिटकरी यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
प्रारंभी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख (जिल्हा कृषि विज्ञान केंद्र] खरपुडी) डॉ. श्रीकृष्ण सोनुने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मार्गदर्शकांनी शेतीविषयक कामे, बी-बियाणे, खते, पशूसंवर्धन, पीक संरक्षण, धान्य साठवण, कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन प्रक्रीया, बाजारपेठ उपलब्धता, शासनामार्फत शेतकरी, अल्पभूधारक इत्यादींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, पिक पेऱ्यांची नोंदणी, ई पिक पाहणी व डिजीटल क्रॉप सर्वे या अॅपमध्ये करणे व पशूपालन या विषयी मार्गदर्शन केले.