जालना | प्रतिनीधी – जालना ते नांदेड या प्रस्तावित समृद्धी महामार्गातील शेतकऱ्यांच्या संपादित जमीनीमधील नोंदी परिशिष्ट १६ नुसार घेवून मुंबई – नागपूर या समृद्धी मार्गासाठी संपादित जमिनींचा मोबदला दिला त्याच धर्तीवर या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अशी मागणी आ. कैलास गोरंटयाल यांनी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे केली आहे. जालना – नांदेड या प्रस्तावित असलेल्या समृद्धी महामार्गाची मौजे हस्ते पिंपळगाव, कडवंची, पानशेंद्रा, रामनगर येथील शेतकऱ्यांच्या शेत जमीनी संपादित करण्यात आलेल्या आहेत. सदर जमीनीचे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या जमीनीतील फळबाग, विहिर, पाईपलाईन, बोअरवेल, ठिबक सिंचन, घरे जनावरांचे गोठे, पाण्याचे हौद आदी बाबींची नोंद परिशिष्ट १६ मध्ये घेण्यात आलेली आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून संपादित करण्यात आलेल्या जमीनीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नोटीसा मिळत असून त्यामध्ये शेतकऱ्यांनी परिशिष्ट १६ नुसार दिलेल्या माहितीतील नोंदी पैकी काही नोंदी वगळण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आ. कैलास गोरंटयाल यांनी संबधित शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची नुकतीच भेट घेऊन जालना – नांदेड या समृध्दी महामार्गासाठी जमिनी संपादित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. जमिनी संपादित करतांना परिशिष्ट १६ मध्ये घेतलेल्या नोंदीतून काही नोंदी कमी करण्यात आल्याचे संबधित शेतकऱ्यांना मिळालेल्या नोटीसांमध्ये स्पष्ट दिसत असल्याचे आ. कैलास गोरंटयाल यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत जर कमी नोंदी दर्शवल्या तर त्यात शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होणार असून शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली आहे असे देखील आ. गोरंटयाल यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या जमीनीचे दर चालू बाजार भावानुसार देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या जमीनीच्या नोंदी जिरायत दर्शवण्यात आल्या आहेत. त्या नोंदी बागायती करून त्यानुसार मावेजा निश्चित करण्यात यावा. मागील चार वर्षापासून शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकलेला असल्याने हवालदील झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मावेजा देतांना या बाबीचा विचार करावा तसेच
शेतकऱ्यांनी परिशिष्ट १६ मध्ये केलेल्या नोंदीनुसार जमीनीसह इतर बाबींचे झालेले मूल्यांकन अत्यल्प असून नोटीसनुसार आणखी कमी करण्यात आलेले आहे. त्यामळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांनी दिलेल्या नोंदीचा विचार करून मावेजा देण्यात यावा. तसेच कोरोना काळात द्राक्षांना अत्यंत अल्प भाव निश्चित करण्यात आला होता. तोच दर आजही कायम ठेवून त्या दरानुसार द्राक्षांच्या झाडांचे मूल्यांकन केले जात असून ही बाब द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. याबाबत देखील प्रशासनाच्या स्तरावरून सकारात्मक विचार करून आजच्या बाजार भावानुसार दर निश्चित करावा अशी मागणीही आ. कैलास गोरंटयाल यांनी यावेळी केली. यावेळी जालन्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, राम सावंत, विधीज्ञ गोपाल मोरे, शरद क्षीरसागर, सोपान तीरुखे यांच्यासह हस्ते पिंपळगांव, रामनगर, पानशेंद्रा, कडवंची येथील शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.