जालना । बालविवाह ही समाजाला लागलेली कीड असून ती आपण दूर केली पाहिजे. मुलगा अथवा मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत, असे प्रतिपादन यशदाचे प्रवीण प्रशिक्षक एम. डी. सरोदे यांनी केले.
जिल्हा बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व जनविकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, गणेशपुर यांच्या संयुक्त विद्यमाने जाफराबाद येथे बुधवार (दि.१२) रोजी ‘आमचा गाव,आमचा विकास’ या कार्यशाळे अंतर्गत बाल विवाहमुक्त गाव अभियान पार पडले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी जनविकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव तथा यशदाचे प्रवीण प्रशिक्षक एम. डी.सरोदे यांनी उपस्थित सरपंच, ग्रामसेवक यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर जाफराबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विष्णू बोडखे, विस्तार अधिकारी एन. टी. खिल्लारे, प्रा. राधेश्याम राजपूत, पत्रकार गजानन उदावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना सरोदे यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम किती गंभीर आहेत हे उपस्थितांना सांगितले. तसेच आमचं गाव आमचं विकास योजनेमधील बालस्नेही गाव यावर देखील त्यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना मार्गदर्शन केले. सदरील अभियानास जिल्हा बालविकास अधिकारी श्रीमती आर.एन. चीमंद्रे व बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे यांचे मोठे मार्गदर्शन लाभले. यावेळी सरपंच व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.