जालना । सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे १० वे राज्यस्तरीय अधिवेशन दिनांक १५ ते १६ ऑक्टोबर दरम्यान जालना शहरात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष काॅ. अण्णा सावंत यांनी आज ( ता. १२) येथे पत्रकार परिषदेत दिली. हाॅटेल अंबर येथे आयोजित पत्रकार परिषदेत अधिक माहिती देतांना काॅ. सावंत म्हणाले की, सीटू प्रणित अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे १० वे राज्य अधिवेशन जालना येथे होत आहे. ही आनंदाची बाब आहे. या संघटनेत अनेक भगिनी बऱ्याच वर्षापासून सक्रीय आहेत. सीटुच्या लढाऊ बाण्यामुळे आणि नेतृत्वाच्या प्रभावामुळे राज्याच्या अनेक जिल्ह्यात या संघटनेचा विस्तार होत आहे. काही जिल्ह्यात ही संघटना मजबुत आहे. प्रमुख मागण्या मान्य करून घेण्यासाठी संपूर्ण राज्यात ही संघटना मजबुत झाली पाहिजे, या अनुषंगाने या अधिवेशनाचे महत्त्व मोठे आहे. या पत्रकार परिषदेस अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. सुनंदा तिडके, सीटूचे जिल्हाध्यक्ष काॅ. मधुकर मोकळे, सरचिटणीस काॅ. अनिल मिसाळ आदींची उपस्थिती होती.
या संघटनेने अनेक प्रश्नांची सोडवणुक केली आहे. सेवा समाप्ती लाभ , मेस्मा कायदा हटविणे ,निवृत्ती वय ६० वरून परत ६५ वर्ष करणे आदी प्रश्नांवर संपूर्ण राज्यात संघटनेने न डगमगता चिकाटीने लढे दिले आहेत. आता नुकतेच गुजरातमधील आपल्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देवुन ग्रॅच्युईटीचा अधिकार मिळवून घेतला आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळवून घेण्याच्या संघटनेच्या लढ्याला बळ मिळाले आहे. या सर्व प्रश्नांवर १० व्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनात सारासार विचार होऊन पुढील दिशा ठरणार आहे.
असे होणार अधिवेशन…
या अधिवेशनाचे उद्धघाटन दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल येथे होणार आहे. उदघाटनापूर्वी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अखिल भारतीय अंगणवाडी फेडरेशनच्या अध्यक्षा काॅ. उषा राणी यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्धघाटन होणार असून अधिवेशनानिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सीटूचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड , सीटूचे जनरल सेक्रेटरी ॲड. एम. एच. शेख हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काॅ. रमेशचंद्र दहिवडे,सरचिटणीस काॅ. शुभा शमीम, शेतमजूर युनियनचे राज्याध्यक्ष काॅ. मारोती खंदारे यांची उपस्थिती राहणार असून या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षा माजी नगराध्यक्ष सौ. संगिता गोरंट्याल यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या जाहीर सभेस जवळपास तीन हजार अंगणवाडी कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून अधिवेशनास राज्यभरातील ३०० प्रतिनिधी या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. पाठक मंगल कार्यालयात आयोजित या दोन दिवशीय अधिवेशनात महत्त्वाचे ठराव पारित केले जाणार असल्याचे काॅ. सावंत यांनी यावेळी सांगितले.