भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; चिमुकल्याचा जागीच मृत्यू

भोकरदन तालुक्यातील गोद्री येथील घटना

177

जालना । भोकरदन तालुक्यातील गोद्री येथील लिंबोळा फाट्यावर रविवारी(दि. ९) रोजी दुपारच्या सुमारास भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात पाच वर्षाचा चिमुकला जागीच ठार झाला आहे तर वडील व चुलत भाऊ जखमी झाले आहेत. जखमींवर भोकरदन येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, भोकरदन येथील इरफान पठाण हे गोद्री येथे लग्न लावण्यासाठी आपल्या मुलास व पुतण्यास सोबत घेऊन गेले होते. लग्न लाऊन भोकरदनला परतत असताना गोद्री पासून काही अंतरावर लिंबोळा शिवारात समोरून भरधाव आलेल्या ट्रॅक्टर (एम.एच.३० जे ८१०४) ने त्यांच्या दुचाकी (एम.एच.४३ डब्ल्यू ९२६७) ला जोराची धडक दिली. त्यात हसनैन इरफान पठाण ( वय ५) वर्ष या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर वडील इरफान सुभान पठाण (वय ३२) वर्ष व जोहेब पठाण (वय ८)वर्ष हे जखमी झाले आहेत. दरम्यान, लग्न लाऊन परत येणाऱ्या नागरिकांनी तात्काळ लहान चिमुकल्याला व जखमींना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी लहान मुलाची तपासणी करून मृत घोषित केले व शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वधिन केला. शहरातील मरकज मस्जिदित ४ वाजता जनाजे नमाज पठण करून जवळील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आला. त्याच्या पश्चात आई वडील, लहान भाऊ, आजी, आजोबा, काका असा परिवार आहे. पुढील तपास पो.हे.कॉ.शेख हे करीत आहे.