अलिबाग : “मी सुद्धा शेतकरीच आहे ” आणि शेतकऱ्यांच्या हिताचे, कृषी क्षेत्रासाठी लाभदायक म्हणून सिद्ध झालेले असे एसआरटी तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कर्जत तालुक्यातील नेरळ येथे दिली.
‘एसआरटी’ शेतकरी कृषी सन्मान सोहळा 2023 चे आयोजन कर्जत तालुक्यातील नेरळ येथील सगुणा बाग येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत,खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, प्रगती, समृद्धी आणि विकासाची गंगा घरा-घरामध्ये पोहोचविण्याची आवश्यकता आहे,त्यासाठीची प्रेरणा अशा मेळाव्यातून मिळते. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज आहे. बदलत्या काळानुसार शेतीतील बदलांना स्वीकारणे, त्याला नव्या तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे.
सर्व समस्यातून बळीराजाला पुढे न्यायचे आहे. यासाठी शाश्वत तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे,असे सांगून ते म्हणाले की, शासनामार्फत हिंगोली येथे स्व.बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र सुरू करीत आहोत. आंबा प्रक्रिया उद्योग, काजू विकास महामंडळ, कांदा प्रक्रिया, असे विविध शेतीपूरक उपक्रम राबविले जात आहेत. जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे पुन्हा सुरू केली आहे. त्याचा लाभ संपूर्ण राज्यभर निश्चितच मोठ्या प्रमाणावर आपल्या शेतकरी बांधवांना होणार आहे.
“एसआरटी चे गुणगान…माती बलवान….पीक पैलवान अन् शेतकरी धनवान”… या ब्रीद वाक्याची प्रशंसा करीत पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्याची आवश्यकता आहे. यंदाचे वर्ष तृणधान्य वर्ष आहे, यासाठी दोनशे कोटी रुपये देण्याचे शासनाने ठरविले आहे. यामुळे तृणधान्य पिकविण्याला प्रोत्साहन मिळेल. ही लोकचळवळ व्हावी, अशा शुभेच्छा देत शेतकऱ्याच्या आयुष्यात चांगले दिवस येण्यासाठी जे जे करणे आवश्यक आहे ते सर्व मी मुख्यमंत्री या नात्याने जरूर करीन,असे मुख्यमंत्री शेवटी म्हणाले.
कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते भूमातेच्या चित्राचे अनावरण करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सगुणा बागचे प्रमुख चंद्रशेखर भडसावळे यांनी केले, तर सूत्रसंचालन निवेदक दीपाली केळकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने एसआरटी तंत्रज्ञानाविषयीचा माहितीपट दाखविण्यात आला. यावेळी शेती संशोधन या विषयात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही संशोधक व शेतकऱ्यांचे प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प उत्तमरित्या राबविणारे कृषी शास्त्रज्ञ विजय कोळेकर, कृषी तंत्रज्ञानाचे नवनवीन प्रयोग करणारे श्री.निवळकर यांचा समावेश होता.