टेंभुर्णी – येथील ग्रामपंचायत तर्फे सुरू करण्यात आलेल्या माहेरची साडी व एफडी या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ३५ नववधूंना माहेरची साडी भेट देण्यात आली आहे. तर गावातील नवीन जन्म घेणारया ११ बालिकांच्या नावे एफडी करण्यात आले आहेत. या लग्नसराईच्या प्रारंभी ग्रामपंचायत तर्फे गावातील प्रत्येक नववधूला माहेरची साडी तर जन्म घेणाऱ्या प्रत्येक बालिकेच्या नावाने एकवीसशे रुपये एफडी हा उपक्रम जाहीर करण्यात आला होता.
नारी सन्मान व्हावा म्हणून गावच्या महिला सरपंच सुमन म्हस्के व त्यांच्या कार्यकारी मंडळाने हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची ग्रामपंचायतची तर्फे यशस्वी अंमलबजावणी केली जात आहे. यात विवाह होऊन सासरला जाणाऱ्या गावातील प्रत्येक नववधूला एक बनारसी साडी माहेरची भेट म्हणून दिली जात आहे. तर गावातील जन्म घेणाऱ्या प्रत्येक बालिकेच्या नावे २ हजार १०० रुपये एफडी केले जात आहे. दरम्यान मुलींच्या जन्माला चालना देण्यासह प्रत्येक नववधूला संपूर्ण गावातर्फे माहेरची साडी भेट देण्याच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
फोटो -टेंभुर्णी येथील शिक्षक दत्तू मुनेमानिक यांची कन्या मंजुषा हिच्या नुकत्याच संपन्न विवाहानंतर नववधूला माहेरची साडी भेट देताना माजी जि.प.सदस्य शालिकराम म्हस्के व इतर.