जालना । प्रतिनिधी – जालना जिल्हा बालविवाह मुक्त करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाकडून गावोगावी मोठ्या प्रमाणात चाईल्ड हेल्पलाईन नं 1098.चा प्रचार प्रसार करण्यात येत आहे त्यामुळे बालविवाहबाबतची माहिती मिळण्यास मदत होत आहे,काल अशाच माहितीच्या आधारवर 1 बालविवाह थांबविण्यात आला होता आणि आज परत चाइल्डलाईन 1098 कडून मिळालेल्या माहिती वरून दामिनी पथक आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी जालना तालुक्यातील वरखेड येथे पोहचले,
तेव्हा घरच्या घरी लग्नाची तयारी सुरु असल्याचे तसेच काही पाहुणे मंडळी आल्याचे दिसून आले सदर मुलगा आणि मुलगी यांच्या वयाची खात्री केली असता मुलीचे वय 13 वर्ष तर मुलाचे वय 14 वर्ष असल्याचे लक्षात आले. यावेळी मुलांच्या खेळण्याच्या वयात लग्न लावणे हा कायद्याने गुन्हा आहे याबाबत बालक बालिका यांच्या आई वडीलाना समज देण्यात आली,पालकांचे समुपदेशन करण्यात आले,तसेच लगेच बालक बालिका व त्यांचे आईवडील यांना पुढील प्रकिया साठी मा.बाल कल्याण समिती जालना यांच्या समक्ष सादर करण्यात आले.
सदर कार्यवाही करण्यासाठी दामिनी पथक प्रमुख रंजना पाटील, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन इंगळे,सहाय्यक फौजदार.श्री.रवी जोशी,पो.कॉ.आरती साबळे,ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी श्री.एम.ए.वझरकर, सरपंच तथा गाव बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष श्री.सर्जेराव शेवाळे यांनी पुढाकार घेतला होता.