जिल्हा महिला रुग्णालयात जागतिक हिवताप दिन साजरा

8

जालना : जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रम राबवून जिल्हा महिला रुग्णालय जालना येथे साजरा करण्यात आला. सुरुवातीस सकाळी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात येवून प्रभातफेरीस जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.एस.डी. गावंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले.

हिवताप रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियंत्रणाकरीता चित्रप्रदर्शन व परिचारिकांनी साकारलेल्या प्रबोधनानात्मक रांगोळीचे उदघाटन महिला रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.गौल व डॉ. श्रध्दा उणवणे यांच्या हस्ते करण्यात आले.  हिवताप जनजागृती महिना साजरा करत असतांना घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व वर्षभरात उत्कृष्टरित्या काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देवून यावेळी गौरव करण्यात आला.

दैनंदिन जीवनातील परिसर स्वच्छता तसेच वैयक्तिकरित्या करावयाच्या उपाययोजना तसेच दारे व खिडक्यांना  डास प्रतिबंधक जाळी बसविणे, पाण्याची डबकी वाहती करणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे, झोपतांना मच्छरदानीचा वापर करणे आदी उपाययोजना माहिती व हिवताप रोगाच्या वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या अळ्या नष्ट करणारे गप्पी मासे  पाळा, हिवताप आजाराची लक्षणे थंडी वाजून ताप येणे, तापात चढ-उतार होणे, मळमळ, डोकेदुखी, घाम येणे अशी असून लक्षणे दिसताच मोफत शासकीय रुग्णालयात तपासणीचे  आवाहनही करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित परिचारिका, जिल्हा महिला रुग्णालय व जिल्हा हिवताप कार्यालयातील अधिकारी -कर्मचाऱ्यांना हिवताप रोग नियंत्रणाबाबत शपथ देवून मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. असे जिल्हा हिवताप अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.