जालना । प्रतिनिधी- देशभर बहुचर्चित झालेला ‘पद्मावत’ चित्रपटाच्या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांना मा. न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. निर्दोष मुक्त झाल्यानंतर न्याय देवतेने न्याय दिल्याची प्रतिक्रिया हिंदु महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सुर्यवंशी यांनी व्यक्त केली.
आर्थिक फायद्यासाठी चित्रपट निर्माता संजय लिला भंसाळी यांनी ‘पद्मावत’ हा चित्रपट निर्मित केला होता. चित्रकरणापुर्वीच सदर चित्रपटास सकल हिंदु धर्मीयांकडून देशभर कडाडून विरोध झाला. याच अनुषंगाने हिंदु महासभा, महाराणा ब्रिगेड व लहुजी शक्ती सेनेच्या पदाधिकार्यांनी धनसिंह सुर्यंवंशी यांच्या नेतृत्त्वात जालना न्यायालयाचे अॅड. लक्ष्मण उढाण यांच्या मार्फत भंसाळी प्रोडक्शन सह जालना जिल्ह्यातील चित्रपटगृहांना नोटीस बजावली होती. परंतू संबंधीतांनी या नोटीसीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी 25 जानेवारी 2018 रोजी आंदोलनाच्या माध्यमातून रोष व्यक्त केला होता. ज्यामुळे सदर बाजार पोलीस ठाणे व कदीम पोलीस ठाणे येथे 307, 436, 336, 337, 427, 395 यासह विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे हिंदु महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सुर्यवंशी यांच्यासह मराठवाडा प्रमुख ईश्वर बिल्होरे, लहुजी शक्ती सेनेचे सचिन क्षीरसागर, महाराणा ब्रिगेडचे कालूसिंह राजपूत, हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते मदनसिंह खोलवाळ, राजसिंह कलाणी, विनोद कौषभ, सचिन हिवाळे यांच्यावर दाखल करण्यात आले होते. परंतु मा. न्यायालयाने दोन फिर्यांदीसह सहा साक्षीदारांची साक्ष ऐकून घेतल्यानंतर आंदोलनकर्त्यांविरोधात सबळ पुरावे आढळून न आल्यामुळे पुराव्याअभावी जिल्हा सत्र न्यायालयाचे मा. न्यायाधीश यांनी आंदोलनकर्त्यांना निर्दोष मुक्त केले. आंदोलनकर्त्यांच्यावतीने अॅड. लक्ष्मण उढाण यांच्यासह अॅड. सोपान शेजुळ, अॅड. निरज धन्ने, अॅड. हरिदास लांडे, अॅड. अमोल लिंगसे आदींनी काम पाहिले. विशेष म्हणजे संबंधीत वकीलांनी सामाजिक भान ठेवून आंदोलनकर्त्यांकडून एक रुपयाही फिस घेतली नाही. त्याबद्दल सामाजिक क्षेत्रातून वकीलांचे अभिनंदन होत आहे.
यासंदर्भात हिंदु महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सुर्यवंशी यांनी न्याय देवतेने न्याय दिल्याची प्रतिक्रीया आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केली. तसेच भंसाळी प्रोडक्शन व ईतरांना दिलेल्या नोटिसीचा आधार घेत भविष्यात त्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा व लागलेला खर्च संबंधीतांकडून वसुल करण्यासाठी त्यांना नोटीसा पाठविण्यात येणार असून भंसाळी प्रोडक्शन विरोधात लवकरच पुन्हा एकदा मा. न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचेही श्री सुर्यवंशी यांनी सांगितले.