महाराष्ट्र भूषण म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान; परंतु महाराष्ट्र शासनाला नेमके पत्रकारांचेच वावडे का?, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचा सवाल

71
मुंबई- आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकरांपासून सुरु झालेली संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योद्धा पत्रकार ‘मराठा’कार प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे ते रंगाण्णा वैद्य, वसंतराव काणे, नारायण आठवले, दादासाहेब पोतनीस, अनंतराव भालेराव अण्णा अशा कितीतरी लढवय्या पत्रकारांची परंपरा मराठी पत्रसृष्टीला लाभली आहे. राज्यातील अनेक पत्रकार आजही या दैदिप्यमान परंपरेचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत. तरीही महाराष्ट्र शासनाच्या वतीने आजपर्यंत गेल्या २७ वर्षात देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भुषण या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत पत्रकार दिसले नाहीत, की हा पुरस्कार देण्यास लायक राज्यात एकही पत्रकार नाहीत? शासनाला पत्रकारांचे वावडे आहे का? अशा प्रखर सवाल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी महाराष्ट्र सरकारला विचारला आहे. एस. एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आलं.. यापुर्वी त्यांचे वडिल निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांनाही हा पुरस्कार दिला गेला होता.. पिता – पुत्राला पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ.. महाराष्ट्र भूषण पुरस्कार १९९६ मध्ये सुरू झाला.. पुरस्काराचे पहिले मानकरी होते पु. ल. देशपांडे तर दुसऱ्या मानकरी होत्या लता मंगेशकर. महाराष्ट्र भूषणने सन्मानित झालेल्या लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, भीमसेन जोशी पुढे भारत रत्न ठरलेले आहेत.. त्यानंतरचे मानकरी -विजय भटकर, सचिन तेंडुलकर, भीमसेन जोशी, अभय आणि राणी बंग, बाबा आमटे, रघुनाथ माशेलकर, रतन टाटा, रा. कृ. पाटील, नानासाहेब धर्माधिकारी, मंगेश पाडगावकर, सुलोचना, जयंत नारळीकर, अनिल काकोडकर, बाबासाहेब पुरंदरे, राम सुतार, आशा भोसले, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासह साहित्य, संगीत, कला, क्रीडा, विज्ञान, समाजसेवा, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना महाराष्ट्र भूषणने सन्मानित करण्यात आले असले तरी आतापर्यंत एकाही पत्रकाराला हा पुरस्कार मिळू नये याचं आश्चर्य वाटते.. महाराष्ट्र भूषण योग्य एकही पत्रकार राज्यात नाही की, पत्रकाराला हा पुरस्कार द्यायचाच नाही, की शासनालाच पत्रकारांचे वावडे आहे? असा  प्रखर सवाल देशमुख यांनी केला आहे.