शेडनेट व औजारे बँकेतून शेतकर्‍यांच्या दारी आली समृध्दी!

25

जालना :- शेतकर्‍यांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घेतल्यास शेती समृध्द करता येतेच शिवाय आर्थिक उत्पन्नातही भर पडते. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील तपोवन या गावातील पदवीधर शेतकरी आप्पासाहेब कुंडलिक कढवणे यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून शेडनेटचा लाभ घेतला. याव्दारे बीजोत्पादन करुन ते चांगले उत्पन्न मिळवत आहेत. यावरच न थांबता त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार शेतकरी गटाची स्थापन करुन कृषी औजारे बँक सुरु केली. परिसरात ते आज प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळखले जात आहेत.

तरुण शेतकरी असणारे आप्पासाहेब यांच्याकडे 50 गुंठे शेती आहे. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने सुरुवातीला त्यांनी गोवा राज्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी केली. तर कुटुंबातील इतर सदस्य दुसर्‍याच्या शेतात मजुरी करत असत. एक भाऊ वाहनचालक म्हणून काम करत होता. अशा बिकट परिस्थितीवर मात करुन वेगळ कार्य करण्याची जिद्द त्यांनी मनात बाळगली. योगायोगाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत त्यांच्या गावाची निवड झाली.

आप्पासाहेब म्हणाले की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून प्रगती साधता येईल, या उद्देशाने मी गावी आलो. या योजनेत शेडनेटसाठी 75 टक्के अनुदान मिळते. त्यामुळे कृषी विभागाकडे शेडनेटसाठी अर्ज केला, आणि काही दिवसांतच त्याला मंजूरीही मिळाली. सुरुवातीला 10 गुंठे जमिनीवर शेडनेटचा लाभ घेतला. त्याव्दारे बिजोत्पादन करायला लागलो. तीन महिन्यांत त्यामधून खर्च वजा जाता 70 हजार रुपये आर्थिक फायदा झाला. मागील वर्षात 10 गुंठयावरील शेडनेटमध्ये मिरचीचे बीजोत्पादन घेतले. याशिवाय अन्य 10 गुंठयातील शेडनेटमध्ये बीजोत्पादनासाठी टोमॅटोचे रोपन केले आहे. यातूनही चांगले उत्पन्न मिळणार, हे निश्चित आहे.

एकीकडे शेडनेटमधून चांगले उत्पादन मिळत असताना यावरच न थांबता कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार 20 शेतकर्‍यांचा शेतकरी बचत गट स्थापन केला. हिंदवी स्वराज शेतकारी बचत गट असे गटाचे नाव आहे. त्या माध्यमातून औजारे बँक सुरु केली. त्यासाठी 60 टक्के अनुदान मिळाले. या औजार बँकेच्या माध्यमातून गावातील शेतीचे कामे अल्पदरात करून दिली जात आहेत. यातून गटातील सर्व सदस्यांना चांगला आर्थिक लाभही मिळत आहे. प्रारंभी खर्च वजा जाता गटाला 2 लाख 10 हजार रुपयांचा फायदा झाला, असे आप्पासाहेब यांनी सांगितले.

शासकीय योजनांच्या माध्यमातून शेती आधुनिक व नाविण्यपूर्ण पध्दतीने केल्यास निश्चित फायदा होतोच सोबत जोडधंदा केल्यास आर्थिक उत्पन्नही वाढते.