नगर परिषदेच्या साहित्य खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन गुन्हा दाखल करा-विकासकुमार बागडी

82

जालना : नगर परिषदेने खरेदी केलेल्या साहित्यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असून सदरची खरेदी ही शासन नियमाप्रमाणे  करण्यात आली नाही. त्यामुळे संबंधितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जालना समाचारचे संपादक विकासकुमार बागडी यांनी केली आहे.
या ंसंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात श्री. बागडी यांनी म्हटले आहे की,  उद्योग उर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण – 2016/ प्र. क्र. 215/ उद्योग- 4 दिनांक 24.08.2017 अन्वये जेईएम पोर्टलवरुन खरेदी करण्याबाबत सूचना दिलेल्या असतांना सुध्दा दरपत्रके मागविण्यात आली आहे. कोणतेही वस्तु किंवा साहित्य जेईएम पोर्टलवरुन खरेदी करण्यात आलेली नाहीत. भांडार विभाग प्रमुख आणि कर्मचार्यांनी साहित्य एकत्रित खरेदी न करता सदर खरेदीचे 3.00 लक्ष पर्यंतचे तुकडे करुन खरेदी केल्याचे दाखविले आहे. ज्यामुळे नगर परिषदेचे भांडार विभाग प्रमुख आणि कर्मचार्‍यांनी बोगस पुरवठा संस्थेला आणि कर्मचारी यांनी बोगस पुरवठा संस्थेला प्राधान्य देण्यात आले आहे. सन 2017 ते  2023 या कार्यकाळामध्ये भांडार विभाग मार्फत पुरवठा दारांना लाभ होईल, अशी प्रक्रिया राबविलेली दिसून येत आहे. सदर साहित्य खरेदी व्यवहारमध्ये नगर पालिकेच्या लेखापालने कोणतेही आक्षेप न घेता व संचिका न तपासता सढळ हाताने साहित्य खरेदी संबंधित बिलाची रक्कम मंजूर करुन दिली आहे. हा सर्व प्रकार लेखापाल आणि भांडार पालाने जाणीवपूर्वक केलेला असल्याचे दिसून येत  आहे. तेव्हा विनंती करण्यात येत आहे की, सदर प्रकरणामध्ये चौकशी करुन भांडार पाल आणि लेखापाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणीही श्री. बागडी यांनी या निवेदनात केली आहे.