डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तरूण पिढीसाठी दिशादर्शक – डॉ. कांबळे

7

जालना- आजची तरुण पिढी वाचन संस्कृती विसरून चालली असून या तरुण पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परिवर्तनवादी विचार आत्मसात करावेत,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे तरूण पिढीसाठी दिशादर्शक ठरणारे आहेत,असे प्रतिपादन परखड विचारवंत डॉ. अनिल कांबळे यांनी येथे केले.
जालना शहरात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. माजी मंत्री आमदार राजेश टोपे हे यावेळी अध्यक्षस्थानी होते. रिपाइंचे नेते ड ब्रम्हानंद चव्हाण, प्रा. डॉ. कालिदास सूर्यवंशी,उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश खंडाळे, रविंद्र तौर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.विचारमंचावर व्याख्यानमालेचे अध्यक्ष दीपक धामने, सचिव राजेश ओ. राऊत, राजेंद्र जाधव, तय्यब देशमुख, सय्यद रहीम आदींची उपस्थिती होती.
’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ आणि आजचा तरुण’ या विषयावर विचार मांडताना डॉ. कांबळे पुढे म्हणाले की, आज तरूण पिढी दिशाहीन झाल्याचे चित्र दिसत आहे. या पिढीला वाचनाची सवय राहिलेली नाही, मोबाईल युगात दंग झालेल्या या तरूण पिढीला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. महापुरुषांचे परिवर्तनवादी विचार या तरूण पिढीला दिशादर्शक ठरतील, यात शंका नाही. तरूण पिढीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात केले तर त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल निश्चित होईल. आजच्या तरूण पिढीला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांचे विचार मोलाचे ठरतील.तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे इतर समाजाला कळावेत, असे आचरण तरूणांनी करावे, असे आवाहन करून डॉ.कांबळे यांनी वर्तमान सामाजिक व राजकीय परिस्थितीवर परखडपणे मत मांडले.

सावधान होणे गरजेचे- चव्हाण

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना रिपाइंचे नेते ड ब्रम्हानंद चव्हाण म्हणाले की, आज समाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले परिवर्तन होणे गरजेचे आहे. आज काही मंडळी बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न करीत आहेत, या मंडळीपासून सावधान होणे गरजेचे आहे. महापुरुषांच्या विचारांचा जागर होण्यासाठी तसेच वैचारिक परिवर्तन होण्यासाठी व्याख्यानमाला महत्त्वाचे माध्यम असल्याचे सांगून मोतीतलावात तथागत गौतम बुद्ध यांचा पुतळा बसविण्यासाठी सर्व समाज घटकांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जो असहिष्णू तोच सहिष्णू म्हणून समोर येत आहे- डॉ. सूर्यवंशी

यावेळी बोलतांना प्रा. डॉ. कालिदास सूर्यवंशी यांनी’ असहिष्णुता आणि भारतीय लोकशाही’या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले की, लोकशाहीत बंधुभाव असल्याशिवाय सहिष्णु माणसाचा मापदंड मोजता येणार नाही. एकीकडे धर्म संस्थेने राजकारणाला गिळंकृत केले आहे, जो असहिष्णू आहे तोच सहिष्णू म्हणून समोर येत आहे. खरा धार्मिक असणारा माणूस हा सहिष्णू असतो. सहिष्णूता बाळगणे हा माणूस असल्याचा पुरावा असल्याचे ते म्हणाले. यावेळी रवींद्र तौर, सुरेश खंडाळे, भास्कर अंबेकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

सहिष्णू समाज निर्माण होणे गरजेचे- आ. टोपे

अध्यक्षीय समारोप करतांना माजी मंत्री आमदार राजेश टोपे म्हणाले की, आज देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सहिष्णुता म्हणजे आपण व्यक्त केलेल्या मताला संमती देणे होय, तर अधिकची मुस्कटदाबी म्हणजे असहिष्णुता होय. वाढत चाललेली असहिष्णुता ही लोकशाहीसाठी घातक आहे. मानवी मूल्ये व लोकशाहीची मूल्ये जपणे गरजेची आहे, सहिष्णुता वृत्ती जपणे व असहिष्णुता रोखणे हे आपल्या समोरील आव्हान आहे. सहिष्णू समाज निर्माण व्हावा, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते, ते पूर्ण करणे हे आज गरजेचे आहे. सहिष्णुतेमुळे लोकशाही अबाधित राहणार आहे, असहिष्णुतेला विरोध करणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हा आपला आत्मा आहे. प्रत्येकाने भारतीय संविधानाची तत्वे जपली पाहिजेत, असे आवाहनही आमदार टोपे यांनी यावेळी केले.

व्याख्यानमालेचे सचिव राजेश ओ. राऊत यांनी प्रास्ताविक केले, प्रमोदकुमार डोंगरदिवे यांनी सूत्रसंचालन केले तर मिलिंद बोर्डे यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक नेते ड. बी. एम. साळवे, प्रा. बसवराज कोरे, राम साळवे, समीर अहेमद, प्रमोदकुमार रत्नपारखे,सुनील साळवे, सुधाकर रत्नपारखे, महेंद्र रत्नपारखे, संजय इंगळे, दिलीप शिंदे, मनोहर उघडे, सुभाष म्हसके,सुहास साळवे, श्रीमती गयाबाई साळवे, अनुराधा हेरकर, वैशाली सरदार,अशोक घोडे, राहुल सोनवणे,संजय म्हसके, गोरख खरात यांच्यासह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.