महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा; उद्धव ठाकरेंचा शिंदे-भाजपा सरकारसह मोदी-शहांवर टोलेबाजी, शिवरायांचा अपमान करत होते तेव्हा त्यांची दातखिळी बसली होती का? अजित पवाराचा शिंदे-भाजपाला प्रश्‍न

35

छ.संभाजीनगर/औरंगाबाद । प्रतिनिधी – तुम्ही पक्ष चोरलाय, धनुष्यबाण ही चोरले आणि आता वडील चोरायचा प्रयत्न करता आहात, त्यांच्या वडीलांना काय वाटत असेल, यांना बापही दुसर्‍यांचा लागतो, अशी जहरी टिका करतांनाच हिंमत असेल तर तुम्ही मोदींच्या नावाने मते मागा मी बाळासाहेबांच्या नावाने मागतो, नंतर पाहून महाराष्ट्र कुणाच्या पाठीमागे आहे. असे आव्हान शिंदे- भाजपा सरकारला उद्धव ठाकरे यांनी दिले. ते छत्रपती संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
भाजपने न्यायव्यवस्था ही आपल्या हातात घेण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ज्या दिवशी न्यायालय यांच्या बुडाखाली जाईल, तो दिवस लोकशाहीचा शेवटचा दिवस असेल असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. इस्त्रायलमध्ये हाच प्रकार होत असून त्याच्याविरोधात सगळी जनता आणि अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरल्याचं दिसलं. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत विरोधी पक्षांना त्रास दिला जातोय, मेघालयात ज्या संगमांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता, आता त्यांच्याबरोबर सत्ता स्थापन केली. भारतीय जनता पक्ष म्हणून भ्रष्टाचारांना सोबत घेत असाल तर भारतीय जनतेचा अपमान आहे. तुमचे हिंदुत्व आम्ही मानणार नाही. आधी भाजपच्या व्यासपीठावर साधू संत दिसायचे आता संधीसाधू दिसतात. सावरकर याचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत आहे का? अमित शाह म्हणाले की उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, पण जमीन दाखवायची असेल तर पाकव्याप्त काश्मीरची एक इंच जमीन घेऊन दाखवा, तर आम्ही मानू. वल्लभभाईंचा पुतळा उभा केला, देशभरातून पोलाद गोळा केले, पण त्या पोलादाचा एक कण तरी धमन्यामध्ये आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. माझा पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला, वडीलही चोरायचा प्रयत्न केला, त्यांच्या वडिलांना काय वाटत असेल अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला. जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मोदींच्या नावे मतं मागा, मी माझ्या बापाच्या नावाने मतं मागतो, मग समजेल महाराष्ट्र कोणाच्या मागे आहे असं आव्हानही त्यांनी दिलं.
या देशाचा पंतप्रधान हिंदू असतानाही भाजप हिंदू आक्रोश यात्रा काढते, म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना या देशात हिंदू सुरक्षित नाहीत का असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला. या आधीही मी संभाजीनगरला आलोय, याच शहरात 1988 साली महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आली आणि शिवसेनाप्रमुखांनी या शहराचं नाव बदललं, संभाजीनगर. गेली 25 वर्षे आपण भ्रमात होतो, भाजपसोबत आपली युती होती. पण औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर झालं नव्हतं. पण महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि भाजपला जे जमलं नाही ते आम्ही करुन दाखवलं. करायचं काय नाही, नुसतं कोंबडं झुंजवत बसायचं ही भाजपची खेळी. दंगली घडवल्या जातात, त्यामुळे निवडणुका जवळ आल्याचं समजू घ्या असं उद्धव ठाकरे म्हणाले.
एका बाजूला पदवी दाखवूनसुद्धा युवकांना नोकरी मिळत नाही, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी विचारली तर 25 हजारांचा दंड भरावा लागतो. आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी पंतप्रधान झाला, त्याचा अभिमान त्या महाविद्यालयाला कसा झाला नाही असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

शिवरायांचा अपमान करत होते तेव्हा त्यांची दातखिळी बसली होती का? अजित पवाराचा शिंदे-भाजपाला प्रश्‍न

सावरकर गौरव यात्रा काढायला आमचा विरोध नाही, आम्हाला सर्व महापुरुषांबद्दल आदर, त्यांच्यासमोर नतमस्तक आहे. पण भाजपच्या माजी राज्यपालांनी, नेत्यांनी या आधी महापुरुषांच्या विरोधात वक्तव्यं केली. शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला, छत्रपतींचा अपमान होताना तुमची दातखिळी बसली होती का असा प्रश्‍न अजित पवार यांनी केला. हे शक्तीहीन सरकार असल्याचे सर्वोच्च न्यायायलाने म्हटले. या सरकारला जनाची नाही तर मनाची तरी वाटायला पाहिजे असेही ते म्हणाले.
अवकाळी नुकसान, विम्याचे पैसे अजूनही शेतकर्‍यांना मिळाले नाहीत, या सरकारचा पायगुण चांगला नाही, हे सरकार आल्यापासून राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याचा टोलाही अजित पवार यांनी लगावला. भाजप-शिंदे सरकारची सावरकर गौरव यात्रा ही केवळ मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी आहे, त्यांना सावरकरांबद्दल कोणताही आदर नाही असा आरोप करत तुमच्यात जर हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले. जेव्हा जेव्हा राज्यावर संकट येते, त्यावेळी मराठी माणून पेटून उठतो. राज्यात महाविकास सरकार असताना ते कोणत्या परिस्थिती अस्तित्वात आले हे पटवून देण्यासाठी सभा घेणार होतो, पण मात्र आधी कोरोना आणि नंतर काही घडामोडी घडल्या आणि सभा राहिली. महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले.