जालना जिल्हा कृषी महोत्सवाचे थाटात उदघाटन; शेतीपूरक व्यवसायाची जोड देत आधुनिक पध्दतीने शेती करावी – पालकमंत्री सावे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकर्‍यांनी प्रगती करावी – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे

24

जालना । प्रतिनिधी – शेतकर्‍यांना विविध शासकीय योजनांची तसेच नवनवीन अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, तज्ञांचे मार्गदर्शन लाभावे आणि विविध भागातून आलेल्या शेतकर्‍यांमध्ये सुसंवाद घडवा यासाठी आपल्या जिल्हयात कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून याचा शेतकर्‍यांनी अवश्य लाभ घ्यावा. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकर्‍यांनी प्रगती करावी, असे आवाहन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना जिल्हा कृषी महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी केले. तर राज्यशासन सदैव शेतकर्‍यांच्या पाठीशी असून शासनाने शेतकर्‍यांसाठी अनेकविध योजना जाहीर केल्या आहेत, त्याचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा व शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड देत आधुनिक पध्दतीने शेती करावी, असे आवाहन सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.
जालना येथील पांजरपोळ संस्थानच्या गौरक्षण मैदानावर जालना जिल्हा कृषी महोत्सव-2023 चे उदघाटन आज थाटात पार पडले. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे व पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते कृषी महोत्सवाचे उदघाटन झाले. कार्यक्रमास आमदार कैलास गोरटंयाल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, विभागीय कृषी सहसंचालक डी.एल.जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, आत्माच्या प्रकल्प संचालक शितल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले की, शेतीच्या उत्पादन वाढीसाठी शेतकर्‍यांमध्ये माहितीची देवाण-घेवाण व्हावी हा सुध्दा कृषी महोत्सवाचा उद्देश आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. शेतकर्‍यांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या पिकाचे जास्त उत्पादन होते याचा अभ्यास करुन केंद्र शासनाने त्या पिकाच्या वाढीसाठी आणि त्यावर प्रक्रीया करुन अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन मिळावे याकरीता जिल्हानिहाय पिकांची निवड केली आहे. आपल्या जालना जिल्हयात मोसंबीचे जास्त उत्पादन होते. मोसंबीवर आधारीत प्रक्रिया उद्योग करण्यासाठी सबसिडीही उलपब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ शेती करुन फायदा होणार नाही तर शेतीसोबतच अन्न प्रक्रिया उद्योग उभारुन शेतकरी सधन होण्यास मदत मिळणार आहे. पोकरा योजनेत जालना जिल्ह्याने कौतूकास्पद काम केले आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन शास्त्रोक्त पध्दतीने शेती करण्यावर शेतकर्‍यांचा भर असायला हवा. शेतकर्‍यांनी प्राधान्याने माती परिक्षण करुन घ्यावे व कृषी तज्ज्ञांनी ठरवलेल्या मात्राप्रमाणेच खताची मात्रा पिकांना द्यावी. कृषी अधिकार्‍यांच्या सातत्याने संपर्कात राहावे, असे सांगून जिल्हा कृषी महोत्सवात कृषीतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य असून शेतकर्‍यांच्या आर्थिक समृध्दीसाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. अचानक आलेल्या नैसर्गिक संकटावर मात करता यावी आणि कर्जबाजारीपणातून बाहेर येण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर शेतकर्‍यांना बी-बियाणे खरेदी करता यावे याकरीता 6 हजार रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी निराश होऊ नये. शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड देत आधुनिक पध्दतीने शेती करावी. शेतकर्‍यांना नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी कृषी विभागाने सातत्याने अभ्यास दौरे आयोजित करावे. राज्य शासन यासाठी निश्चितपणे आवश्यक निधीची तरतूद करेल.
कृषी प्रदर्शनात महिला बचत गटाच्या सदस्यांनी अत्यंत चांगली उत्पादने तयार करुन विक्रीसाठी ठेवली आहेत, असे कौतुक करुन पालकमंत्री पुढे म्हणाले की, शेतकरी बांधव हा आमचा प्राण आहे त्यामुळे त्यांना कसे आर्थिक सक्षम करता येईल यावर शासन भर देत आहे. शेतकर्‍यांच्या अनुषंगाने महत्वाचे विविध निर्णय अधिवेशनात जाहीर केल्या गेले आहेत. शेतकर्‍यांनी जिल्हा कृषी प्रदर्शनात सक्रीय सहभाग नोंदवून शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी नवनवीन प्रयोग करावेत.
आमदार कुचे म्हणाले की, शेतकर्‍यांना नजरेसमोर ठेवून राज्य शासनाने विविध योजना जाहीर केल्या आहेत. अर्थसंकल्पातही शेतकर्‍यांसाठी मोठया प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेती करावी. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक डी.एल.जाधव यांनीही मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी कृषी प्रदर्शनाचा उद्देश स्पष्ट करत असतांना प्रदर्शनात एकुण 200 स्टॉलची उभारणी करण्यात आले असल्याचे सांगून कृषी उत्पादने, शेतीनिगडीत औजारे, शेतीसंबंधी उद्योग, मविमच्या महिला बचतगटांची उत्पादने यांच्यासह दररोज तीन चार कृषीतज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. यावेळी विविध योजनांच्या घडीपुस्तिकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. सुत्रसंचालन प्रवीण कन्नडकर यांनी केले. आभार माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी उमेश कहाते यांनी मानले. कृषी महोत्सवाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. कार्यक्रमात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी आपल्या सेवा काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल व ते नियत वयोमानानूसार 31 मार्च 2023 रोजी सेवानिवृत्त होत असल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी सर्व मान्यवरांनी कृषी प्रदर्शनातील सर्व स्टॉल्सना भेट दिली. यावेळी ड्रोनव्दारे फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. कार्यक्रमास मोठया संख्येन शेतकरी, महिला, नागरिक, यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
दि. 30 मार्चपर्यंत चालणार्‍या या कृषी महोत्सवात शासकीय दालन, विविध शेतीशी संबंधीत कंपन्यांचे स्टॉल्स, बचतगटाचे स्टॉल्स, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे स्टॉल्स, प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे. कृषी आणि पूरक व्यवसायाशी निगडित एकात्मिक शेती पद्धती संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कृषी संबंधित कृषी तंत्रज्ञान विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, संबंधित विविध कृषी महामंडळे यांचाही सक्रिय सहभाग आहे.