दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणार – मंत्री संजय राठोड

123

मुंबई  : राज्यात दुधात होणारी भेसळ खपवून घेतली जाणार नाही. दुधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचा कायदा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आला असून याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये झालेल्या दूध भेसळीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. राठोड यांनी बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील दूध भेसळीच्या प्रकरणासंदर्भात विभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. ते म्हणाले की, भेसळीसंदर्भात राज्यात सर्वत्र कडक तपासणी करण्यात येईल. दुधाचा अधिक व्यवसाय होतो, अशा ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येईल. भेसळीमध्ये वापर होणाऱ्या अन्न पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्याबाबत देखील विचार करण्यात येईल. दुधाबाबत राज्याचे जुने वैभव पुन्हा मिळविण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी मंत्रीमंडळात चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी याबाबतच्या एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य शशिकांत शिंदे आदींनी सहभाग घेतला.