महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला अर्थसंकल्प हा जनतेच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आहे. या अर्थसंकल्पात सर्वच समाज घटकांसाठी भरघोस मदत जाहीर केली आहे. जालना जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी जालना-खामगाव रेल्वे मार्ग आणि भोकरदन तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र जाळीचा देवच्या विकासासाठी भरीव तरतूद करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
राज्याचा अर्थसंकल्प हा कृषीप्रधान असून शेतकरी, शेतमजूर तसेच महिला व सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू समोर ठेवून मांडणी करण्यात आल्याची प्रतिक्रिया लोकप्रतिनिधी आणि जनतेतून व्यक्त होत आहे. जालना जिल्हा हा उद्योगनगरी म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात स्टील उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय बियाणे कंपन्या व इतर उद्योगही या जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात एकूण आठ तालुके असून शेतकऱ्यांची संख्याही अधिक आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या व इतर शेतीपूरक उद्योग व्यवसाय करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या हिताचा असून यातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ विनासायास मिळणार आहे.
शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत केंद्र सरकार प्रमाणे दर वर्षी अतिरिक्त सहा हजार रुपये थेट अनुदान, एक रुपयात पीक विम्याचे कवच मिळणार असल्याने शेतकऱ्यांत आंनदाचे वातावरण आहे. महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकीट दरात ५० टक्क्यांची सवलत मिळाली असल्याने महिलांनीही समाधान व्यक्त केले आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस ते प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांसाठी भरीव मदत जाहीर करण्यात आली आहे. महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेत विमा संरक्षण मर्यादा दीड लाखावरून पाच लाखांवर करण्यात आली आहे, यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षण क्षेत्रात आठवीपर्यंत मोफत गणवेश वाटप करण्याबरोबरच शिष्यवृत्तीत वाढ केल्याने विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रती गोडी वाढणार आहे.
या अर्थसंकल्पात महापुरुषांचे स्मारके, धार्मिक स्थळं यांच्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. जालना- बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या भोकरदन तालुक्यातील महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्री क्षेत्र जाळीचा देव या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात आल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तर प्रवाशांच्या सोयीसाठी उपयुक्त असणारा जालना-खामगाव या रेल्वे मार्गासाठी 50 टक्के राज्य हिश्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आल्याने जालना जिल्हा विदर्भाशी रेल्वेने जोडल्या जाणार आहे, त्यामुळे प्रवासी वाहतुकीसह व्यापार-उद्योगाला अधिक चालना मिळणार आहे. एकंदरीत सर्वांनाच दिलासा देणारा व जालना जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हा अर्थसंकल्प लाभदायी ठरणारा आहे.