जाफराबाद । प्रतिनिधी – जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मावणीसह राज्य सरकारी कर्मचार्यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपास आज बुधवारी ता.15 दुसर्या दिवशी जाफराबाद तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला.येथील तहसील कार्यलयाच्या प्रांगणात संपकर्यांनी दिलेल्या ठिय्या आंदोलनात हजारो शिक्षक,आरोग्य कर्मचारी,महसूल कर्मचारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व विविध विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.एकच मिशन जुनी पेन्शन,कोण म्हणतं देत नाय,घेतल्याशिवाय राहत नाय च्या घोषणांनी तहसील परिसर दणाणला.दरम्यान जिल्हा परिषद शिक्षक मोठया संख्येने संपात उतरल्याने अनेक शाळा बंद होत्या. महसूल कर्मचारी ही सहभागी झाल्याने तहसील, पंचायत समितीचे कामकाज ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले.यावेळी प्रहार चे अमोल तोंडे, जमीर शेख, श्री खंडागळे, एकनाथ भोपळे, चेअरमन विनोद कळंबे, संजय लहाने, सी.आय.पठाण, अभिजित साळवे, विजय वैद्य, नसीम शेख, राजू मुरकुटे, सुखदेव अवकाळे, श्री सपकाळ, गजानन मांटे, सीमा रिंढे, कैलास चेके यांच्यासह विविध संघटनेच्या पदाधिकार्यांची भाषणे झाली. सरकार जो पर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करत नाही तो पर्यंत संप मागे न घेता अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.उद्या पासून तालुक्यातील सर्व म्हणजे 100 टक्के शाळा बंद करून 100 टक्के शिक्षक ग संपात सहभागी होतील असा संकल्प शिक्षक संघटनांनी केला तर आरोग्य कर्मचारी पूर्ण शक्तीनिशी या संपात शेवटपर्यंत लढतील असा निर्धार आरोग्य कर्मचार्यांनी केला.यावेळी प्राथमिक शिक्षक संघ, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, उर्दू शिक्षक संघटना, महाराष्ट्र शिक्षक संघटना, शिक्षक भारती, प्रहार संघटना, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ, मागासवर्गीय शिक्षक संघटना, समता संघटना, शिक्षक परिषद, पीडीएसपी, माध्यमिक शिक्षक संघटना, केंद्रप्रमुख संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, कृषी सहाय्यक संघटना, महसूल कर्मचारी संघटना, ग्रामसेवक युनियन, तलाठी संघ व विविध संगटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.सूत्रसंचालन दिपक चव्हाण यांनी केले.राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.