जळगाव- किसानपुत्र आंदोलनाच्या अवहानानुसार शेतकरी आत्महत्या थांबाव्यात म्हणून आज (13 मार्च) रोजी किनगाव (ता.यावल जि जळगाव) येथून पदयात्रा निघत आहे. ही पदयात्रा चोपडा, अंमळनेर मार्गे 19 मार्च रोजी धुळ्याला पोचणार आहे.
किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी सांगितले की, डॉ. राजीव बसर्गेकर (नवी मुंबई) आणि सुभाष कच्छवे (परभणी) हे या पदयात्रेचे संचालन करणार आहेत. पदयात्रेत एकूण अकरा जण पूर्णवेळ राहणार असून अनेक लोक या गावातून त्या गावापर्यंत चालणार आहेत.
शेतकऱ्यांच्या मालाचे भाव कोसळत आहेत. कापूस, सोयाबीन, कांदा, हरभरा आदी पिकांना केवळ सरकारी हस्तक्षेपामुळे फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीत शेतकऱयांच्या बाजूने आवाज उठवावा म्हणून ही पदयात्रा काढण्यात आली आहे, असे अमर हबीब यांनी सांगितले.
19 मार्चला अन्नत्याग
19 मार्च रोजी (साहेबराव करपे कुटुंबियांच्या सामूहिक आत्महत्येच्या दिवशी) राज्यभर अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. लाखो सुजाण नागरिक वैयक्तिक उपवास करतील तर शेकडो ठिकाणी सामूहिक उपोषण केले जाणार आहे. किसानपुत्र आंदोलनाच्या आवाहानानुसार 2017 पासून लाखो लोक 19 मार्चला अन्नत्याग (उपवास) करतात.
धुळ्यात समारोप
किनगावहून निघालेल्या या पदयात्रेचा समारोप जेल मैदान येथे सभा घेऊन होणार आहे. या सभेत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे (अकोला) प्रख्यात विचारवंत विनय हार्डीकर (पुणे) किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते अमर हबीब (आंबाजोगाई) हे मार्गदर्शन करणार आहेत.