जालना । प्रतिनिधी – शहराचे आकर्षण असलेल्या मोतीबाग तलावाच्या काठाला मृत्यू झालेल्या माशांचा मोठा खच बघायला मिळत आहे. अज्ञात रोगाने या माशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शुक्रवार (दि 3) दुपारी तीन वाजेच्या सुमारास हजारो मासे तलावाच्या पाण्यात तरंगताना दिसून आले आहेत. माशांचा मृत्यू संसर्गजन्य आजाराने झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला असून मृत माशांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती पशुधन अधिकार्यांनी सांगितली असून त्यानंतरच माशांचा मृत्यूचे नेमके कारण लक्षात येणार आहे.
शहराती मोती तलावात शुक्रवार रोजी दुपारच्या सुमारास मृत माशांचा खच दिसून आल्यानंतर ही माहीती शहरात वार्यासारखी पसरल्याने खळबळ उडाली आहे. मोती तलावात एका गुत्तेदाराकडून माशांचे बीज टाकण्यात आले होते. माशांच्या अशा मृत्यूमुळे या गुत्तेदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तलावात जवळपास चार टन माशांचे बीज टाकले असल्याची माहिती मिळत आहे. मृत माशांच्या या घटनेमुळे परिसरात दुर्गंधी आणि रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला असून नगर पालिका प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
पशुधन विभागाच्या एका पथकाने मृत माशांचे नमुने तपासणीसाठी घेतले असून डॉक्टरांनी या माशांची तपासणी करत शवविच्छेदन केले. प्रथमदर्शनी या माशांचा मृत्यू संसर्गजन्य आजाराने झाला असावा असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय. शिवाय मृत माशांचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवणार असल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ.विजय झांबरे यांनी सांगितले आहे.