दिव्यांगांना अग्रशक्ती बहु मंडळचा आधार! ; मोफत तपासणीसह नारायण लिम्ब (हात-पाय) मोजमाप शिबीराचे आयोजन; गरजुंनी लाभ घ्यावा – आयुषी बगडीया

22

जालना । प्रतिनिधी – दिव्यांग आणि पिडीतांच्या सेवेत गेल्या तीन दशकांपासून कार्यरत असलेल्या उदयपुर (राजस्थान) येथील नारायण सेवा संस्थान आणि जालन्यातील अग्रशक्ती बहु मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जालना येथे दिव्यांगांची तपासणी, ऑपरेशनसाठी निवड, हात-पाय मोजमाप शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अग्रशक्ती बहु मंडळाच्या अध्यक्ष आयुषी बगडीया यांनी येथे दिली. तसेच या शिबीराचा गरजुंनी लाभ घ्यावा असे आवाहनही आयुषी बगडीया यांनी केले.
शहरातील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी अग्रशक्ती बहु मंडळाच्या सल्लागार सारिका तालुका, सचिव शितल अग्रवाल, पुजा तवरावाला, ममता गुप्ता, प्रिती मल्लावत, संध्या अग्रवाल, मेघा बगडीया, स्नेहा भारुका आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना आयुषी बगडीया यांनी नारायण सेवा संस्थानच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. या संस्थेच्या माध्यमातून पोलिओग्रस्तांचे ऑपरेशन निशुल्क करण्यात येते. तसेच हात पाय नसलेल्या किंवा अपघातात हात-पाय गमावलेल्या दिव्यांगांसाठीही संस्था हात-पाय बसविण्याचे काम गेली अनेक वर्षांपासून करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून अग्रशक्ती बहु मंडळाच्या सौजन्याने जालना शहरातील हॉटेल बगडीया येथे येत्या 14 मार्च रोजी दिव्यांगांसाठी मोफत तपासणी, ऑपरेशनसाठी निवड व हात-पाय मोजमाप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत संभाजी नगर परिसरातील हॉटेल बगडीया इंटरनॅशनल येथे होणार आहे. या शिबीराचा सर्व गरजुंनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सचिव शितल अग्रवाल यांनी नारायण सेवा संस्थानच्यावतीने डॉक्टरांची आठ जणांची टिम या शिबीरासाठी येणार असल्याचे सांगतांना शिबीरादरम्यान दिव्यांगांची मोफत तपासणी केली जाणार आहे. या तपासणीनंतर ज्या पोलिओग्रस्त रुग्णांचे ऑपरेशन करण्याचे ठरेल अशांना उदयपुर येथे ऑपरेशनसाठी पाठविण्यात येणार आहे. तसेच काही कारणवश अथवा अपघातात हात-पाय गमावलेल्यांची तपासणी करण्यात येणार असून त्यांच्या हात-पायाचे मोजमाप करण्यात येणार आहे. त्यांनतर उदयपुर येथून ते बनवून आणल्या जाणार आहेत. जवळपास दीड महिन्यानंतर पुन्हा एक शिबीर जालन्यात आयोजित करण्यात येणार असून त्या शिबीरात या रुग्णांना ते हात-पाय बसविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच कोपर्‍यापासून खाली हात गमावलेल्या रुग्णांना या उपचारानंतर काही कामे जसे की वाहन चालविण्यासारखे कार्य करता येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
सल्लागार सारिका तालुका यांनी या शिबीराचा लाभ घेण्यासाठी गरजुंनी येत्या 11 मार्चपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रोजेक्ट चेअरमन संध्या अग्रवाल, प्रिती मल्लावत, ममता गुप्ता यांच्याशी 7020871423, 9595479111, 7499082109 या क्रमांकावर सकाळी 11 ते सायं 5 वाजेदरम्यान संपर्क साधावा असेही सारिका तालुका यांनी यावेळी सांगितले. अग्रशक्ती बहु मंडळाच्या या शिबीरामुळे दिव्यांगांना मोठा आधार मिळणार आहे.