महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

35

मुंबई : अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ राबवीत असलेल्या ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना तसेच केंद्र शासनाच्या एनएसएफडीसी उच्च शैक्षणिक योजनेसाठी कर्ज प्रस्ताव  पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय मुंबई शहर कार्यालयाकरिता सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ५० टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनांकरिता ४५ टक्क्यांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. या दोन्ही योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविण्यात येतात. तसेच केंद्र  सरकारच्या एनएसएफडीसी उच्च शैक्षणिक योजनेसाठी कर्ज प्रस्ताव सादर करण्याकरीता या महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदारांनी महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून तीन प्रतींद्वारे अर्ज स्वतः अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय मुंबई शहर कार्यालयात दाखल करावा. त्रयस्थ तसेच मध्यस्थीमार्फत कर्ज अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.

५० टक्के अनुदान योजनेसाठी प्रकल्प मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत आणि प्रकल्प मर्यादेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते व उर्वरित रक्कम बँकेमार्फत देण्‍यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे.

बीज भांडवल योजनेसाठी प्रकल्प मर्यादा रु. ५० हजार ते रु. ५ लाखापर्यंत., प्रकल्प मर्यादेच्या २० टक्के बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत ४ टक्के द. सा. द. शे. व्याजदराने देण्यात येते. या राशीमध्ये महामंडळाच्या अनुदानाचे १० हजार रुपये समाविष्ट आहे. बँकेचे कर्ज ७५ टक्के देण्यात येते व या कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो, महामंडळाचे व बॅंकेच्या कर्जाची  परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार ३ ते ५ वर्षाच्या आत करावी लागेल,अर्जदारास ५ टक्के स्वत:चा सहभाग भरावयाचा आहे.

उच्च शैक्षणिक कर्ज योजनेसाठी एनएसफएसडीसी योजनेंतर्गत व्यावसायिक व तांत्रिक उच्च शिक्षणाकरिता देशांतर्गत कर्ज मर्यादा रु.२० लाख रुपये व देशाबाहेर कर्ज मर्यादा ३० लाख रुपये आहे.

        तीनही योजनेकरिता अर्ज करण्यास आवश्यक पात्रता :

अर्जदार अनुसूचित जाती/नवबौद्ध संवर्गातील असावा व त्याचे वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे. राज्य महामंडळाच्या योजने करीता वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरी व ग्रामीण भागाकरिता रुपये ३ लाख असावी. केंद्रीय महामंडळाच्या योजना करिता वार्षिक उत्पन्न रु. ३ लाख इतकी आहे,अर्जदार हा महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा (राज्य / केंद्र) थकबाकीदार नसावा.

अर्ज करण्यास आवश्यक कागदपत्रे : जातीचा व उत्पनाचा सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला दाखला, २ पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड प्रत, कोटेशन, व्यवसायासाठी आवश्यक असल्यास जागेचा पुरावा, व्यवसायानुरुप इतर आवश्यक दाखले, आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल, व्यवसायानुरुप आवश्यकतेप्रमाणे इतर दाखलेपत्र, उदा. वाहनाकरीता व व्यवसायाकरिता लायसन्स, परवाना, बॅज नंबर इत्यादी, बँकेचे खाते क्रमांक व पासबुकची झेरॉक्स, महामंडळाच्या नियमानुसार उच्च शैक्षणिक योजनेकरिता कागदपत्रे सादर करावी, असे आवाहन महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ जिल्हा कार्यालय मुंबई शहरमार्फत करण्यात आले आहे.