मराठी सर्वांना सामावून घेणारी भाषा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

10

मुंबई : “जी भाषा जात-पात विसरून सर्वांना सामावून घेते तीच विश्वाची भाषा होते. हे सर्व गुण मराठी भाषेत आहेत. या भाषेचा वापर अधिकाधिक करून मराठी भाषा समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी आवर्जून मराठी बोलले, लिहिले पाहिजे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात ‘मराठी भाषा दिनानिमित्त’ महाराष्ट्र विधानमंडळ आयोजित ‘साहित्याची ज्ञानयात्रा’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठी भाषा ही प्राचीन आणि समृद्ध आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर, कवी कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, डॉ.भालचंद्र नेमाडे असे ज्ञानपीठ विजेत्यांचे मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी योगदान आहे. याचबरोबर विजय तेंडुलकर, जयंत पवार ते अगदी आताचे प्रणव सखदेव, प्रवीण बांदेकर असे वास्तवाला भिडणारे अनेक लेखक मराठीत आहेत. या मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शब्दांची देवाणघेवाण झाली पाहिजे. अशा देवाणघेवाणीमुळे भाषा प्रवाही व जिवंत राहते. महाराष्ट्राला गौरवशाली साहित्य आणि संस्कृतीची परंपरा लाभली आहे. आपले साहित्य एक अमूल्य ठेवा आहे. राज्य शासनाने अलिकडेच शिवजयंतीच्या मुहूर्तावर राजा बढे यांनी लिहिलेल्या “जय जय महाराष्ट्र माझा” या गीताला राज्य गीताचा दर्जा दिला आहे. साहित्य, मराठी भाषा आणि राज्याचा अभिमान यांना एकत्र आणल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मराठी भाषा ही २५०० वर्षांपूर्वीची आहे. नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण देता येणार आहे. साहित्य संमेलनासाठी साहित्यिकांच्या समस्या शासन सोडवेल आणि मदत करेल. मराठी भाषा भवनाचे काम लवकरच गतीने पूर्ण करू, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,