जालना । प्रशासनाने सर्वसामान्यांना वेळेत सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच प्रलंबित सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. कुठल्याही कामात दिरंगाई करु नये. तसेच विभाग अद्यावत ठेवावा, अशी सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली. हर घर नर्सरी, वृक्षलागवड, थोडेसे मायाबापासाठी पण, माझे कार्यालय, सुंदर कार्यालय, एक गाव एक पाणवठा (प्राण्यांसाठी पाणवठा), शालेय विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज आयोजित आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपायुक्त (महसूल) पराग सोमण, उपायुक्त (रोहयो) समीक्षा चंद्रकार, सहायक उपायुक्त (विकास) वीणा सुपेकर आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगर पालिकांचे मुख्याधिकारी व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
श्री. केंद्रेकर म्हणाले की, महसूल विभागाची प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करण्याबरोबरच शासकीय महसुलाची वसूली वेळेत पूर्ण करण्यात यावी. वाळू घाट लिलावाची प्रक्रीया तातडीने पूर्ण करावी. वाळू चोरीला आळा घालावा. फेरफार अदालतीचे आयोजन करुन प्रलंबित फेरफार लवकर निकाली काढावेत. शहीद जवानांच्या कायदेशीर वारसास जमीन प्रदान करण्याबाबतची प्रकरणे प्राधान्याने हाताळून मार्गी लावावीत. रब्बी हंगामात ई-पिक पाहणी 100 टक्के पूर्ण होईल यादृष्टीने नियोजन करत वेळोवेळी आढावा घ्यावा. मातोश्री शेत पाणंद रस्ते या योजनेच्या माध्यमातून पाणंद रस्ते शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावेत यासाठी तातडीने कामे करावीत. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील दगडखाणी याची माहिती जाणून घेत योग्य त्या सूचना केल्या.
जालना जिल्हा हरित करण्यासाठी जिल्हयात वृक्ष लागवड होणे आवश्यक असल्याचे सांगून श्री. केंद्रेकर पुढे म्हणाले की, लागवडीसाठी वृक्षांची मोठया प्रमाणात उपलब्धता होण्याकरीता ‘हर घर नर्सरी’ उपक्रमातंर्गत प्रत्येक कुटुंबाने किमान 50 झाडे तयार करण्यासाठी नगर पालिका व गट विकास अधिकाऱ्यांनी त्यादृष्टीने कार्यवाही करावी. घरांना होणाऱ्या पाणीपुरवठयातील दिवसांचा खंड कमी करण्याच्या दृष्टीने नगर पालिकेने कार्यवाही करावी. अवैध नळ जोडणी विरोधात कडक कार्यवाई करावी. तसेच प्लास्टीक बंदी, करवसूली, वृक्षलागवड याबाबत कार्यवाही करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.
आरोग्य विभागाने सर्व शासकीय रुग्णालयात एक्स रे मशिन, ईसीजी मशिन आदींसह आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. जीवनशैली निरोगी राहण्यासाठी व कुठलाही आजार होऊ नये याकरीता रुग्णांना तपासणीदरम्यान आहारविषयक सल्ला जरुर द्यावा. तसेच विद्यार्थ्यांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात यावे. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण, नियमित व्यायामाचे धडे देण्याबरोबरच, स्क्रीन टाईम कमी करणे, आरोग्य विभागामार्फत प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देणे असे उपक्रम प्राधान्याने राबविण्याची सूचना त्यांनी केली. तसेच विविध घरकुल योजनांचे उदिष्ट वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधीत विभागाला दिले.
जिल्ह्यातील आपल्या अधिनस्त क्षेत्रातील ऐतिहासिक वारसाचे लोकसहभागातून कसे जतन कसे करता येईल, तसेच हे वैभव पुढच्या पिढीपर्यंत कसे पोहचवता येईल यासाठी प्रयत्न कराण्याचेसुध्दा त्यांनी सूचित केले.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी महसुलची शासकीय वसुली, वाळुघाट लिलाव सद्यस्थिती, गौणखनिज, फेरफार नोंदी, ई-चावडी प्रकल्प प्रगती अहवाल, सातबाराचे पैसे चलनाने जमाची माहिती, प्रपत्र-ब विषयक सविस्तर माहिती, शहीद जवानांच्या कायदेशीर वारसास जमीन प्रदान, भोगवटदार वर्ग-2, ई-पिक पाहणी सद्यस्थिती, पोट खराब क्षेत्र आकारणी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, ई-ऑफिस कामकाज अंमलबजावणी, मंत्रालयीन दक्षता व पीएसी निरीक्षण पथक अहवाल, अतिवृष्टी व पुरपरिस्थिती, प्रकल्पातील पाणीसाठा, शेतकरी आत्महत्या, रिक्त पदाची माहिती, प्रलंबित विभागीय चौकशी, आश्वासित प्रगती योजना, ज्येष्ठता यादी, अनुकंपा यादी, प्रलंबित महसूल अपील प्रकरणांचा आढावा, लेखा परिच्छेदाचे अनुपालन, विशेष सहाय्य योजना, वृक्ष लागवड, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, भूसंपादन आदी विषयक माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी श्री. केंद्रेकर यांनी जिल्हा परिषद, नगरपालीका, आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी विभाग, शिक्षण विभाग आदी विभागांचाही आढावा घेतला. याप्रसंगी आरोग्य विभागाच्या नवीन ओपीडी फॉर्मचे विमोचन श्री. केंद्रेकर यांच्या हस्ते करण्यात आले.