राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 2 हजार 491 प्रकरणे निकाली

11 प्रकरणात जोडप्यांनी सामंजस्यातुन जोडीने संसार करण्याचा घेतला निर्णय

47

जालना । येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून शनिवार दि. 12 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पक्षकारांनी आपापली प्रकरणे सामजस्यांने न्याय तडजोडीने निकाली काढण्यासाठी संबंधित न्यायालयाकडे अर्ज सादर केले होते. यातील 2 हजार 491 प्रकरणे सामजस्यांने निकाली काढण्यात आली. तर 9 कोटी 10 लाख 39 हजार 538 रुपये रक्कमेची वसुली करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर.अहिर यांनी दिली आहे.
लोकन्यायालय म्हणजे गाव पंचायतीचेच आधुनिक रुप आहे जेथे कायदा जाणणाऱ्या नि:पक्षपाती लोकांचे न्यायमंडळ त्यांच्यापुढे येणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने न्याय तडजोडीने निकाली काढत असतात.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सर्व प्रकारची तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे , मोटार वाहन अपघातांची प्रकरणे , धनादेश अनादर संदर्भातील प्रकरणे, विद्युत प्रकरणे, बँकेची प्रलंबित व दावा दाखल पूर्व प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, बीएसएनएलची दावा दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी दावा दाखल पूर्व 1 हजार137 प्रकरणे निकाली निघाली व या प्रकरणात तडजोड रक्कम 2 कोटी 36 लाख 31 हजार 81 रुपये झाली. न्यायालयातील 597 प्रकरणे निकाली निघाली व या प्रकरणात तडजोड रक्कम 6 कोटी 74 लाख 8 हजार 457 एवढी झाली. तसेच विशेष मोहिमेअंतर्गत 757 प्रकरणे निकाली निघाली. अशाप्रकारे राष्ट्रीय लोक अदालती मध्ये एकूण 2 हजार 491 प्रकरणे निकाली काढण्यात येऊन या प्रकरणात 9 कोटी 10 लाख 39 हजार 538 एवढी तडजोड रक्कम झाली आहे. वाहतूक शाखेच्या ई-चलानमध्ये एकुण 2 हजार 185 प्रकरणे निकाली निघून 12 लाख 21 हजार 350 रुपये शासन दरबारी जमा झाले आहेत.
जालना कौटुंबिक न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 13 प्रकरणात सन्मानजनक तडजोड होऊन प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामधील 11 प्रकरणातील जोडप्यांनी परस्परांमधील वाद सामंजस्याने मिटवून घटस्फोटाचा मार्ग सोडून पुन्हा जोडीने संसार करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष व्ही. एम. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर.अहिर व सर्व पॅनल प्रमुख म्हणुन कर्तव्य असणारे न्यायीक अधिकारी आणि पॅनल विधीज्ञ यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. तसेच आयोजित कार्यक्रमास जालना जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. रामेश्वर गव्हाणे, जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. बाबासाहेब इंगळे यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले. यावेळी विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते.