सामान्य नागरिक व शेतकर्‍यांना धीर देण्यासाठी अंबेकर यांची जालन्यात शेतकरी संवाद पायी दिंडी

29

जालना । जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व वाढती महागाई यामुळे अडचणीत आलेल्या सामान्य नागरिक व शेतकर्‍यांना धीर देण्यासाठी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी जालना तालुक्यातील नेर येथून आज सोमवारी(दि. 14) रोजी शेतकरी संवाद दिंडी काढली. या शेतकरी संवाद पायी दिंडीत माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, डॉ.हिकमत उढाण, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे, उभ्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.मात्र त्या प्रमाणात शेतकर्‍यांना मदत मिळालेली नाही.सातत्याने वाढणारे जीवनाश्यक वस्तुंचे भाव व शेतकर्‍यांच्या शेत मालाचे उतरलेले भाव यामुळे सामान्य शेतकरी व नागरिकांचे जीवन अत्यंत जिकीरीचे झालेले आहे.अशा परिस्थितीत सामान्य नागरिक व शेतकरी यांची व्यथा जाणून त्यांना धीर देण्यासाठी,त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी जालना तालुक्यातील नेर येथील श्रीवटेश्वर संस्थान येथून १४ नोव्हेबरपासून शेतकरी दिंडीस प्रारंभ केला आहे. जालना तालुक्यातील श्रीवटेश्वर संस्थान नेर येथून निघणाऱ्या या दिंडीचा टाकरवन, मोतीगव्हाण, मानेगाव, मानेगाव तांडा, बाजी उम्रद, जळगाव, सिंधीकाळेगाव, पिरकल्याण, धारकल्याण, नाव्हा, वरुड, वाघ्रुळ, गोंदेगाव, वजारउम्रद मार्गे जात पिरपिंपळगाव येथे १८ नोव्हेंबर रोजी समारोप होणार आहे. या शेतकरी संवाद दिंडीत मोठ्या संख्येने नागरिक,शेतकरी, शिवसैनिक व पदाधिकारी सहभागी झाले होते.