मुंबई । पशुसंवर्धन विभागाच्या सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यासाठी आणि त्या सेवा तत्परतेने व पूर्ण कार्यक्षमतेने पुरविण्यासाठी विभागाच्या काही संस्था व कार्यालयांमध्ये संरचनात्मक सुधारणा करणे आणि संस्था, कार्यालयांच्या पदांचा आकृतिबंध सुधारित करणे आवश्यक असल्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
राज्यातील पशुधनास झालेल्या लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाच्या आकृतिबंधविषयी मंत्रालय येथे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, सह सचिव मानिक गुट्टे, सह आयुक्त डॉ. डी.डी.परकाळे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री विखे-पाटील म्हणाले, राज्यातील पशुधनास झालेल्या लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात लम्पीच्या रुग्णांमध्ये घट होत आहे. परंतु बुलढाणा जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्ष रहावे. यासाठी मनुष्यबळ कमी पडू दिले जाणार नाही असे त्यांनी सांगितले.
तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या तालुका पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय संस्थांची कार्यात्मक संरचना सुधारणे. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी १ व २ यांच्या मंजूर पदांमध्ये समान आकृतीबंधानुसार सुसुत्रता आणणे. राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी -१ व श्रेणी २ जिल्हा परिषदांकडे वर्ग करणे. जिल्हा परिषदांतर्गत कार्यरत असलेले फिरते पशुवैद्यकीय दवाखाने बंद करणे. पशुधन विकास अधिकारी गट ब (राजपत्रित) यांच्या पदांची स्थाननिश्चिती करणे. सघन कुक्कुट विकास गट या संस्था जिल्हा परिषदांकडून पशुसवंर्धन विभागाकडे पुन्हा वर्ग करून घेणे. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, जिल्हा पशुसवंर्धन उपआयुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद या कार्यालयांचे बळकटीकरण करणे. पशुसंवर्धन विभागातील गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदे निरसीत घोषित करणे. तसेच या सेवा कंत्राटी पध्दतीने उच्च शिक्षित व स्थानिक कर्मचारी यांचेकडून उपलब्ध करुन जास्त कार्यक्षम सेवा देणे शक्य होणार आहे. आदी विषयावर सविस्तर चर्चा यावेळी मंत्री विखे पाटील यांनी केली असून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.