पशुधनाच्या सुरक्षेसाठी राज्यात “माझा गोठा, स्वच्छ गोठा”अभियान प्रभावीपणे राबवावे – राधाकृष्ण विखे पाटील

16

मुंबई । लम्पीसारख्या संसर्गजन्य रोगापासून पशुधन सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यात “माझा गोठा, स्वच्छ गोठा” अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महसूल,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाविषयी मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या बैठकीस  पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, सह सचिव मानिक गुट्टे, सह आयुक्त डॉ. डी.डी.परकाळे यांच्यासह दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पशुसंवर्धन मंत्री श्री. विखे- पाटील म्हणाले,  “माझा गोठा, स्वच्छ गोठा” अभियान हे एक क्रांतिकारक अभियान असून एक चळवळ उभी करावी. हे अभियान महसूल, कृषी, पशुसंवर्धन आणि ग्रामविकास विभागाने समन्वयाने राबवावे. गोठा स्वच्छ ठेवल्यास लम्पी तसेच इतर संसर्गजन्य रोगांपासून भविष्यातही पशुधन सुरक्षित राहू शकेल. लम्पी चर्मरोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो. महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवाव्यात.

राज्यात लम्पी चर्मरोग नियंत्रणात आणण्यासाठी जास्त प्रादुर्भाव असणाऱ्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण करण्यासाठी प्राधान्य द्यावे. गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी यांना जबाबदारी सोपवावी. रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी करण्यात येणाऱ्या प्रत्येक बाबींवर गांभीर्याने लक्ष ठेवावे, अशा सूचना देखील मंत्री श्री. विखे- पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

रोग नियंत्रणासाठी जिल्ह्याला आणखी एक कोटी रुपये

रोग नियंत्रणासाठी प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यात आणखी एक कोटी रुपये देण्यात येणार आहेत. शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. औषधी, लसमात्रा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे. राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे ज्यांचे गोवंशीय पशुधन मृत्यूमुखी पडले आहे त्या  पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जात आहे. मदतीपासून वंचित असलेल्या पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईची रक्कम तातडीने जमा करण्याचे निर्देश मंत्री श्री. विखे-पाटील यांनी दिले.